मुंबईकरांनो जरा जपून! तुमच्यावर आता CCTVची करडी नजर, एक चूक करताच कारवाई होणार; आयुक्तांचे कडक आदेश

मुंबई शहरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेनं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या तसेच घाण करणाऱ्यांविरोधात कडक करवाई केली जाणार आहे. आजपासून मुंबईतील सर्व 24 वॉर्डांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

आता सीसीटीव्हीची नजर

स्वच्छता मोहीम ही अधिक यशस्वी आणि कडक करण्यासाठी ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचत असेल, त्या ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावण्यात येणार आहेत. कॅमेऱ्यांच्या मदतीनेच अशा ठिकाणांवर सातत्यानं लक्ष ठेवलं जाईल. जर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची ओळख पटली तर त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मुंबईतील ज्या ठिकाणी नेहमीच कचरा साचवला जातो, अशा सर्व ठिकाणांची यादीही पालिकेनं तयार करुन ठेवली आहे. विशेष म्हणजे ही ठिकाणं गुगल मॅपवरही चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना त्या भागांवर अधिक लक्ष ठेवणं आणि त्या ठिकाणांची वेळेवर स्वच्छता करणं हे अधिक सोपं होणार आहे.

नियम मोडल्यास काय होईल?

मुंबई महापालिकेच्या या नव्या नियमांनुसार, उघड्यावर कचरा टाकताना किंवा सार्वजनिक ठिकाणी जर घाण करताना कोणी आढळलं तर त्या संबंधित व्यक्तीवर 200 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे. या कामासाठी प्रत्येक वॉर्डमधील पथके ही कारवाई करणार आहेत. खरं तर पालिकेचं म्हणणं आहे की, आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांचं सहकार्य तितकेच महत्त्वाचे असेल, त्यामुळे प्रत्येकानेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं टाळावं शिवाय सर्व स्वच्छता नियमांचं पालन करावं. या नव्या मोहिमेमुळे नक्की मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मदत होईल.

आयुक्तांचे निर्देश काय?

१. प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या सर्व सहायक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमितपणे स्वच्छताविषयक पाहणी करावी आणि व्यापक स्तरावर प्रभावीपणे स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी.

२. शाळा, रुग्णालये, रेल्वे, मेट्रो स्थानक, बस स्थानक, तसेच बाजारपेठ आदी परिसरातील पदपथांवरील सर्व प्रकारचे अतिक्रमण तत्काळ हटवून पदपथ चालण्यास सुलभ करावेत.

३.खड्ड्यांच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करावे

४. वारसा स्थळे, पर्यटनस्थळे, प्रमुख सार्वजनिक परिसर, तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहिमा राबवाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *