वर्क फ्रॉम होमच्या नावाने ठकबाजी; ‘स्टार’ रेटिंगच्या जाळ्यात नाशिकचा तरुण, 11 लाखांना गंडवलं, प्रकरण काय?

‘घरबसल्या काम करा, ऑनलाइन प्रॉडक्ट्सला ‘५ स्टार’ रेटिंग द्या आणि काही मिनिटांत २० टक्के कमिशन मिळवा’, सोशल मीडियावर सहज दिसणारी हीच जाहिरात नाशिकमधील एका सुशिक्षित तरुणासाठी भयंकर आर्थिक आपत्ती ठरली आहे. सायबर संशयितांच्या जाळ्यात अडकून तरुणाने स्वतःसह वडिलांचे ११ लाख २७० रुपये अवघ्या चार दिवसांत गमावले आहेत.

सिडको परिसरातील पाटीलनगर येथे राहणारा ३१ वर्षीय तरुण खासगी नोकरी करतो. अतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असताना एप्रिलच्या सुरुवातीला त्यांने ‘www.clubmall.vip’ नावाची एक वेबसाइट सापडली. संशयितांनी तरुणाला सुरुवातीला ‘ऑनलाइन डेमो’ दिला. ७ एप्रिल रोजी तरुणाने ९ हजार ४०१ रुपये भरून दोन ‘प्रॉडक्ट्सना रेटिंग’ दिले. अवघ्या काही वेळात पंधरा टक्के कमिशनसह पैसे वेबसाइटवरील डिजिटल वॉलेटमध्ये दिसू लागले.

पैसे त्वरित वाढताना दिसल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांना अधिक कमिशनचे आमिष दाखवत विविध ‘टास्क’ पूर्ण करण्यास सांगितले. ७ ते १० एप्रिल या अवघ्या चार दिवसांत तरुणाने स्वतःच्या बँक खात्यातून ८ व्यवहारांद्वारे ६ लाख ५५ हजार ६३६ रुपये आणि वडिलांच्या बँक खात्यातून ५ लाख ४ हजार १२६ रुपये असे एकूण दहा टप्प्यांत ११ लाख २७० रुपये संशयितांच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. जेव्हा तरुणाने मूळ भरलेली रक्कम आणि त्यावरील कमिशन बँक खात्यात काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयितांनी नवीन नियम, टॅक्स आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैशांची मागणी केली.

पैसे परत देण्यास नकार मिळताच आणि व्हॉट्सॲपवरून उडवाउडवीची उत्तरे मिळताच तरुणाने नाशिक सायबर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *