अन्न व औषध प्रशासनाने जून-जुलै 2026 दरम्यान पुण्यासह राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन आणि भ्रामक जाहिरातींविरोधात 88 कारवाया केल्या. या मोहिमेत सुमारे 9.50 कोटी रुपयांचा बेकायदेशीर औषध व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. 20 गुन्हे दाखल करून 10 आरोपींना अटक करण्यात आली, तर नियमभंग करणाऱ्या तीन रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
बनावट औषधे, बोगस सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना औषध उत्पादन-विक्री, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि एनडीपीएस औषधांच्या गैरवापराविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर धडक मोहीम राबविली आहे.
औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, वैद्यकीय उपकरण नियम, एनडीपीएस कायदा, तसेच औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियमांतर्गत ही राज्यव्यापी कारवाई करण्यात आली. भ्रामक व अवास्तव दावे करणाऱ्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या जाहिरातींविरोधात 31 आस्थापनांवर कारवाई करून 55.57 लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली. आजार बरे करण्याचे दावे करणान्या उत्पादनांची विशेष तपासणीही करण्यात आली.
राज्यातील नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर,
अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, अकोला, सातारा, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे विनापरवाना औषध उत्पादन व विक्रीविरोधात 27 कारवाया करण्यात आल्या.
सौंदर्य क्रीमच्या कारखान्याला टाळे
मुंबई आणि भिवंडी येथे विनापरवाना व मिसब्रेडेड सौंदर्यप्रसाधनांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. बैंच क्रमांक, उत्पादन व मुदतबाह्यता दिनांक नसलेली, तसेच खोट्या पत्त्यावर उत्पादित झाल्याचे दर्शविणारी उत्पादने जप्त करण्यात आली.
पाकिस्तानी क्रीमची विक्री
शहरातील मोगलपुरा परिसरातील एका कॉस्मेटिक दुकानातून प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा (क्रीम) साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहीद रियाज शेख (वय ३६) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 12 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिकलकर लाइन मोगलपुरा येथील गोल्डन मार्केटिंग कॉस्मेटिक दुकानाची तपासणी केली असता, प्रतिबंधित असलेली ‘गोरी ब्यूटी क्रीम मेड इन पाकिस्तान’, ‘पाकिस्तान स्टैंडर्ड’ असे निळ्या अक्षरात लिहिले होते. क्रीमवर मेड इन पाकिस्तान’, लाल अक्षरात ‘पाकिस्तान स्टैंडर्ड’ लिहिले होते. अशा प्रकारच्या प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
जे. जे. महानगर रक्तपेढीसह राज्यातील विविध रक्तपेढ्या आणि रक्तसंकलन केंद्रांतील गैरप्रकारांचा ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने पर्दाफाश केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या प्रकारांची गंभीर दखल घेतली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांसाठी नव्या रक्तधोरणांतर्गत कडक निर्देश लागू करण्यात येणार असून, रक्तदान शिबिर आयोजकांसाठीही स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले आहेत.
