सध्या पावसाचं वातावरण आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाळ्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त अनेक पर्यटक पावसाळी सहल म्हणून वेगवेगळ्या धबधबा असलेल्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा आनंद घेत असतात. पण अशाप्रकारचा आनंद कधी जीवावर बेतेल याचा भरोसा नाही. पोलीस प्रशासनाकडून नेहमी पावसाळ्यात नदी किनाऱ्यावर आणि धबधबा असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला जातो. आतादेखील तसेच निर्बंध घालण्यात आली आहेत. पण तरीही काही जण ऐकत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी गेल्यावर अचानक पावसाचा प्रवाह वाढल्यानंतर जीवावर बेतू शकतं. अशीच एक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आज मुसळधार पाऊस पडत आहे. शहापूरच्या डोळखांब परिसरात तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. यामुळे परिसरातील नदी, नाल्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे चोंढा-घाटघर प्रकल्प परिसरात मोठा पाऊस पडला.
तिघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, पावसाच्या लोंढ्यात वाहून गेलेले सर्व पाचही पर्यटक हे कल्याणचे होते. स्थानिक ग्रामस्थांनी प्रसाद रमेश इंगळे, नितेश लहू पाटील आणि अजय कृष्णा मुरकुटे या पर्यटकांचा जीव वाचवला. ते सुखरुप बचावले आहेत. यापैकी प्रसाद इंगळे हे कल्याणच्या आधारवडी येथील रहिवासी आहेत. तर नितेश पाटील हे कल्याणच्या गांधी चौक परिसरात वास्तव्यास आहेत. तर अजय मुरकुटे हे कल्याणच्या बारवेगावचे रहिवासी आहेत.
या घटनेत कल्याणच्या आधारवाडी परिसरात राहणारा 21 वर्षाचा तरुण आकाश महेंद्र देशमुख याचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण पूर्वेत राहणारे 34 वर्षीय दिशेन मांडलकर हे बेपत्ता आहेत. त्यांचा सध्या शोध सुरु आहे.
