मुंबईच्या वेशीवर बांधण्यात येतंय आणखी एक धरण, मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाइन

महाराष्ट्रात आणखी एक धरण होत आहे. मुंबईच्या वेशीजवळच या धरणाचे काम सुरू आहे. एकदा का हे धरण पूर्ण झाल्यास मुंबईला अधिक क्षमतेने पाणी पुरवठा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ‘गारगाई धरण प्रकल्पासंदर्भात’ आढावा बैठक पार पडली. गारगाई धरण प्रकल्पाचे काम मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे. या प्रकल्पाशी संबंधित पुनर्वसन, वनीकरण आणि उभारणीच्या कामांना गती देण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. तसंच, मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाच्या उभारणीला गती देण्यात आली असून, मे 2029 पर्यंत प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गारगाई धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्राच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याला बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्यै काय?

658 हेक्टर बुडीत क्षेत्रात वनजमीन जात असल्याने 1400 हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच बुडीत वनक्षेत्रासाठी वनविकासाकरिता वन विभागाला राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जमीन देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 844 हेक्टर जमीन बाधित होणार असून, त्यामध्ये 186 हेक्टर खासगी जमीन आणि 658 हेक्टर वनजमिनीचा समावेश आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात एकूण 805 हेक्टर जमीन येणार आहे. प्रकल्पामुळे ओगदा आणि खोडदे ही दोन गावे पूर्णतः, तर पाचघर, तिळमाळ, फणसगाव आणि आमले ही 4 गावे अंशतः बाधित होणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹3065 कोटी असून, त्यामध्ये धरण, जलबोगदा, पुनर्वसनासाठी आवश्यक 22 पायाभूत सुविधांची निर्मिती तसेच वीज निर्मिती संचाचा समावेश आहे. याशिवाय जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, पर्यायी वनीकरण, वृक्षांचे निव्वळ वर्तमान मूल्य, सल्लागार सेवा आदी बाबींवरील खर्च कंत्राटी खर्चापेक्षा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

गारगाई धरण प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त होत असून, केंद्रीय जनजातीय मंत्रालय (MoTA), राष्ट्रीय भूकंप संकल्पन मानक समिती यांच्यासह गारगाई धरण प्रकल्पाच्या संकल्पचित्रास तांत्रिक मंजुरी आणि पर्यावरणीय परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाच्या मंजुरीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. यासंदर्भात पुनर्वसन आणि पर्यावरणीय उपाययोजनांवरही विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

काय आहे प्रकल्प?

गारगाई धरण हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. या धरणामुळं वाडा तालुक्यातील ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर, घोडसाखरे या सहा गावांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. ओगदा आणि खोडदे गावांच्या स्थलांतरातून मिळालेल्या क्षेत्रावर प्रकल्पाची बांधणी होणार आहे. तसंच, उर्वरित जागेचा वापर वनीकरणासाठी केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *