मोदींचा बहुचर्चित सेल्फी व्हिडिओ फेसबुकवरुन तात्पुरता हटवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी मध्यरात्री शेअर केलेला व्हिडिओ फेसबुकवरुन अल्प काळासाठी हटवल्याने मोठा गदारोळ उडाला होता. हा व्हिडिओ काही वेळानंतर पुन्हा रिस्टोअर करण्यात आला असून मेटाने माफी मागितली आहे. तांत्रिक अडचणींमुळे हा व्हिडिओ रिमूव्ह करण्यात आल्याची माहिती आहे.

‘मेटा’च्या प्रवक्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, “तो व्हिडिओ चुकून हटवण्यात आला होता. आता तो पूर्ववत करण्यात आला आहे.” परंतु केंद्र सरकार या प्रकाराची तपासणी करत आहे. तात्पुरत्या स्वरुपात हटवलेल्या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी ‘मेटा’च्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटा आणि इंस्टाग्रामच्या जागतिक प्रमुखांना आधीच बोलावणे धाडले आहे.

हा व्हिडिओ गेल्या गुरुवारी मध्यरात्रीनंतर पोस्ट करण्यात आला होता. प्रामुख्याने इन्स्टाग्रामवरील जेन झी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मोदींनी सेल्फी व्हिडिओ केला होता, अन् तो मेटाचा अन्य प्लॅटफॉर्म फेसबुकवरही शेअर करण्यात आला होता. यात NEET-UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देशभरातील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून शांततेचे आवाहन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *