मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी काल सोमवारी दुपारी छापा टाकून स्पाच्या आड सुरू असलेल्या कथित देहव्यापाराचा पर्दाफाश केला. या कारवाईत पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शोळासमोरच संतापजनक कृत्य
पोलिसांना बेव्हर्ली पार्क रोड, आरबीके शाळेसमोरील A.N.K. Luxury Salon & Spa येथे स्पाच्या नावाखाली कथित देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या पथकानं स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान स्पा सेंटरमधून पाच तरुणींची सुटका करण्यात आली. स्पाच्या आड कथित देहव्यापार चालविल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
इतर बाबींचीही चौकशी सुरू
धक्कादायक म्हणजे ज्या स्पा सेंटरवर ही कारवाई करण्यात आली ते शहरातील आरबीके शाळेसमोरच असल्यानं शैक्षणिक संस्थेजवळ अशा प्रकारचे कथित अवैध प्रकार सुरू असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल केला असून स्पा सेंटरचा परवाना, कागदपत्रे आणि या व्यवसायाशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आढळल्यास त्यांनाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रमेश म्हात्रेंची कोर्टाकडे विनवणी
कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळावा यासाठी अक्षरश: विनवणी केल्याची माहिती समोर येत आहे. रमेश म्हात्रे यांच्याकडून वारंवार जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे. याआधी झालेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने रमेश म्हात्रे यांच्या वकिलांना खडेबोल सुनावले होते. ‘रमेश म्हात्रे 25 वर्षाचा तरुण असल्यासारखं डॉक्टरांना मारहाण करतानाच्या व्हिडीओत भासतात. त्यांनी महिलांनाही मारहाण केली. त्यामुळे त्यांना काही दिवस कोठडीत राहू द्या’, असं हायकोर्टाने म्हटलं होतं. यानंतर काल पुन्हा या प्रकरणावर सुनावणी पार पडली. यावेळी रमेश म्हात्रे यांनी जामिनासाठी हायकोर्टाकडे विनवणी केली.
‘माझे वय पाहता मला जामीन मंजूर करावा, हवं तर महाराष्ट्राबाहेरच राहायचं, यासह कठोर अटी घालाव्यात’, अशी विनंती न्यायालयीन कोठडीमुळे तुरुंगात असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी वकिलांमार्फत हायकोर्टाला केली. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील वैयक्तिक कारणामुळे कोर्टात उपस्थित नसल्याने हायकोर्टानं त्या विनंतीबाबत कोणताही अंतरिम दिलासा दिला नाही. हायकोर्टानं आता पुढील सुनावणी शुक्रवारी 31 जुलै दुपारी होणार आहे.
