फेरचौकशी कागदावरच! चेंबूर दुर्घटनेप्रकरणी महापौरांच्या आदेशाला मुंबई महापालिकेचा हरताळ

चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी महापौर रितू तावडे यांनी दिलेल्या फेरचौकशीच्या आदेशाला मुंबई महापालिकेने हरताळ फासला आहे. फेरचौकशीसाठी महापालिकेने कोणत्याही प्रकारची त्रयस्थ संस्था नियुक्त केलेली नाही. महापालिकेच्या या चालढकलीवर शिवसेना नगरसेविका समृद्धी काते यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय देण्याबाबत महापालिका वेळकाढूपणा करत असल्याची टीका केली आहे.

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ ३० जून २०२६ रोजी शाळेच्या बसवर पिंपळ प्रजातीचा वृक्ष मुळासकट उन्मळून कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर १६ जुलैला महापालिका सभागृहात सभागृह नेते गणेश खणकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून चर्चा घडवून आणली.

१२ दिवसांपूर्वी फेरचोकशीचे आदेश

चेंबूरमधील घटनेनंतर महापालिकेने दोन सदस्य समिती नेमली व यावर महापालिकेचे दोन अधिकारी नियुक्त केले. आम्ही त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे यावेळी सभागृहात गणेश खणकर यांनी म्हटले होते. तर महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी, चेंबूरमधील दुर्घटनेतील झाड हे ६० ते ७० वर्ष जुने होते आणि आतून पूर्णपणे पोकळ झाले होते, तर काँक्रीटीकरणासारखे एक कारण नसून, अनेक कारणे असल्याचे त्यावेळी सभागृहात स्पष्ट केले होते. मात्र, हा अहवाल मान्य नसल्याचे सांगत महापौरांनी पुन्हा चौकशी करून सविस्तर अहवाल सभागृहात सादर करण्यास सांगितले. याला १२ दिवस उलटूनही महापालिकेकडून हालचाली झालेल्या नाहीत. सभागृहात झालेल्या या चर्चेचे इतिवृत्त १६ जुलैलाच महापालिका अतिरिक्त आयुक्तांकडे देण्यात आलेले आहे. तरीही महापालिकेकडून याची चौकशीची सुरुवातही झालेली नाही किंवा त्रयस्थ संस्थाही नियुक्त केलेली नाही. यासंदर्भात आपल्याकडे काहीच माहिती नाही, असे महापालिका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिके चालढकल करत असल्याची टीका

महापालिका सभागृहात चेंबूर घटनेवरून झालेल्या चर्चेवेळी शिवसेनेच्या नगरसेविका समृद्धी काते यांनी महापालिकेवर टीका केली होती. विहान श्रीवास्तव हा त्यांच्या मैत्रिणीचाच मुलगा आहे. अद्यापही फेरचौकशी कागदावरच असल्याने यासंदर्भात समृद्धी काते यांना विचारले असता, या घटनेची पुन्हा चौकशी करण्यास मुंबई महापालिका चालढकल करत असल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. महापौरांनी सभागृहात निर्देश देऊनही याची काहीच माहिती समोर आलेली नाही. या घटनेला अधिकारी कारणीभूत असून, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. विहान श्रीवास्तवचे आईवडील लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे काते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *