आयसीआयसीआय बँकेची कर्मचारी पलकच्या मृत्यू प्रकरणी पोलिस तपासात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात हत्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिचा प्रियकर मयंक शाक्य याला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील खजराणा भागात हा प्रकार घडला.

आरोपीचा लग्नासाठी दबाव

मयंक हा पलकवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र तिने नकार दिल्यावर त्याने आधी तिला मारहाण केली. नंतर तिचा गळा आवळून खून केला. ही घटना अपघात असल्याचा भास निर्माण करण्यासाठी त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. तिची बॉडी स्वयंपाकघरात सोडून त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पलक ही मूळची हरदा जिल्ह्यातील टिमरणी येथील रहिवासी होती. ती इंदूरमधील तपेश्वरी बाग कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होती. ती आयसीआयसीआय बँकेत नोकरी करत होती.

रविवारी रात्री तिचं अर्धवट जळालेला शव किचनमध्ये आढळून आलं. स्वयंपाक करताना आग लागून तिचा मृत्यू झाल्याचं चित्र प्रथमदर्शनी दिसत होतं. गॅस शेगडीचा बर्नर वेगळा झाला होता, गॅस गळती होत होती आणि शेगडीवर चिरलेल्या भाज्या ठेवलेल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला हा अपघात असावा असं मानून तपास सुरु करण्यात आला होता.

चेहरा झाकून घराबाहेर पडला

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तेव्हा या प्रकरणाला वेगळं वळण लागलं. फुटेजमध्ये एक तरुण चेहऱ्यावर कापड बांधून घाईघाईने बाहेर पडताना दिसला; त्याच्या पाठीवर एक बॅगही होती. त्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशन डेटाचे विश्लेषण केले.
या तपासामुळे मयंक शाक्य याची ओळख पटली. घटनेच्या वेळी त्याचे लोकेशन खजराणा भागात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने डबरा येथे छापा टाकून आरोपीला अटक केली.

 

आरोपीने गुन्हा कबूल केला

चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज सिंग सेंधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक कुलर दुरुस्तीचे काम करतो. दोघांची भेट साधारण सहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते.

मयंकला पलकशी लग्न करायचे होते, परंतु तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव नाकारला होता; तिचे कुटुंबीय तिच्यासाठी अन्यत्र योग्य जोडीदार शोधत होते. या गोष्टीचा राग आल्याने मयंकने तिला मारण्याचा कट रचला आणि पेट्रोलची बाटली घेऊन तिच्या घरी पोहोचला.गळा आवळून हत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, त्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. त्यादरम्यान मयंकने पलकला जमिनीवर पाडून तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ही घटना एक अपघात असल्याचे भासवण्याच्या उद्देशाने त्याने तिच्या बॉडीवर पेट्रोल ओतून त्याला आग लावली आणि घटनास्थळावरुन पळ काढला.

घरमालकाला आढळली अर्धवट जळालेली बॉडी

पलकचा तिच्या कुटुंबीयांशी दोन दिवसांपासून कोणताही संपर्क झाला नव्हता. तिचे वडील राधेश्याम यांनी तिला वारंवार फोन करूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी घरमालकाला तिची विचारपूस करण्यास सांगितले. घरात प्रवेश केल्यावर घरमालकाला पलकचं अर्धवट जळालेलं शव आढळून आलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शवविच्छेदनासाठी तिची बॉडी ‘एमवाय’ रुग्णालयात पाठवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *