बहिणीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या समाजातील तरुणाशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या हल्ल्यात प्रशांत चौधरी (२५) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी आणि संबंधित तरुणी हे वेगवेगळ्या समाजातील असून दोघांमध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी सिल्लोड येथे जाऊन प्रेमविवाह केला. विवाहानंतर दोघे एकत्र राहत असताना या नात्याबद्दल मुलीच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी होती. प्रेमविवाहामुळे कुटुंबाची बदनामी झाल्याची भावना मनात ठेवून मुलीचा सख्खा भाऊ अभिषेक मोरे याने प्रशांत चौधरी याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
मेहुण्याची प्रकृती चिंताजनक
संतापाच्या भरात त्याने मोठा दगड उचलून प्रशांतच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमी प्रशांतला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
संशयित आरोपी ताब्यात
दरम्यान, घटनेनंतर फत्तेपूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी अभिषेक मोरे (१९) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात (Fatehpur Police Station) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९(१) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या समाजातील प्रेमविवाहाच्या विरोधातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हल्ला पूर्वनियोजित होता का, तसेच इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास फत्तेपूर पोलीस करत आहेत.
