बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने Gen Z ला गटारछाप म्हटल्याने वाद निर्माण झाला असून तिच्यावर टीका होत आहे. यानंतर कॉकरोच जनता पार्टीने तिला प्रत्युत्तर दिलं असून तिच्यापेक्षा देशासाठी Gen Z ने दिलेलं योगदान जास्त आहे असं म्हटलं आहे. कंगनावर सीजेपी आणि विरोधकांकडून टीका होत असताना आता तिला भाजपा नेत्यानेच सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला आहे. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे असं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजन यांनी कंगनाच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “अशी वक्तव्यं कोणीही करू नयेत. आपण बोलताना थोडा विचार केला पाहिजे. हा विषय गंभीर आहे. मोदीनी स्वतः या विषयात लक्ष घातलं आहे. परीक्षा पद्धतीमध्ये बदल होत आहे. असं असताना आमदार खासदार मंत्री यांनी थोडं मापून बोललं पाहिजे”.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर ते म्हणाले, “या आंदोलनामध्ये जे खरंच विद्यार्थी आहेत त्यांचा विषय वेगळा आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे राजकीय फायदा कसा उचलता येईल या हेतूने काही राजकीय पक्षाची लोक, गुंड या आंदोलनात मस्ती करत होते. पोलिसांनी या आंदोलनाशी संबंध नसलेली लोक देखील पकडली आहेत, अशा आंदोलकांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र खरंच जे विद्यार्थी या आंदोलनामध्ये उतरले होते त्यांच्या बाबतीत विचार केंद्र सरकार करत आहे. जे फक्त दंगामस्ती करायला, दगडफेक करायला आले होते, पोलिसांवर हल्ला केला, वाहनांची तोडफोड केली अशांना सोडण्याची आवश्यकता नाही”.
