असहाय तरुणीला जेवण देण्याच्या बहाण्याने तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील शेडमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघा नराधमांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
समाजात कठोर संदेश आवश्यक
‘हतबल पीडितेच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन गंभीर आणि घृणास्पद गुन्हा करणारे गुन्हेगार कोणत्याही दयेला पात्र नाहीत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी समाजात कठोर संदेश जाणे आवश्यक आहे,’ असे नमूद करून विशेष न्यायाधीश श्रीराम तापकिरे यांनी हा निकाल दिला.
शरद मुरलीधर साळवे (वय ४०, रा. गदाखेडा, छत्रपती संभाजीनगर) आणि अंकितसिंग रतनसिंग बिस्त उर्फ कांचा (वय ४०, रा. काटे कॉलनी, रावेत) अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात १८ वर्षीय पीडितेने पुणे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली होती.
तळेगाव स्टेशनच्या पार्किंगमधील कारशेडमध्ये कुकर्म
ही घटना २५ ते २६ जानेवारी २०१६ दरम्यान तळेगाव रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधील कारशेडमध्ये घडली. कौटुंबिक वादाला कंटाळून पीडित मुलगी बारामतीहून मुंबईला गेली होती. परतीच्या प्रवासात ती रात्री चुकून तळेगाव रेल्वे स्थानकावर उतरली. तिचा गैरफायदा घेऊन पार्किंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या आरोपींनी तिच्यावर वारंवार सामूहिक अत्याचार केले होते.
अकरा जणांच्या साक्षींची नोंद
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शमसुद्दीन शेख यांनी तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. या खटल्यात विशेष सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी अकरा साक्षीदारांची साक्ष नोंदविली. आरोपींनी दंडाची रक्कम भरल्यानंतर ती पीडितेला देण्यात यावी, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
छ. संभाजीनगरात खून करणाऱ्या जावयाला जन्मठेप
दुसरीकडे, पत्नीला नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून जावयाने सासऱ्याच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही घटना १५ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगापुऱ्यात घडली होती. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर सोनवणे यांच्या कोर्टात खून करणाऱ्या मनोज गठोरसिंग (वय २९) याला जन्मठेप व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
