तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाची धडाकेबाज मोहीम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत दूध भेसळीचा पर्दाफाश करत राहत्या घरात कृत्रिम दूध दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडाकेबाज मोहीम सुरु आहे. त्याच अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कराड तालुक्यातील भेसळखोरांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत शामगाव (ता. कराड) येथील एका घरात कृत्रिम दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच घटनास्थळावरून भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे कराड तालुक्यातील दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.
एफडीएची धाड, संशयास्पद गोष्टी निदर्शनास
कराड तालुक्यातील शामगाव येथे कृत्रिम दूध तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकली असता महेश यशवंत फाटक (वय ४४) आणि स्वाती महेश फाटक (वय ३८) हे केशरी रंगाच्या किटलीत तीन लिटर आणि गुलाबी रंगाच्या किटलीत दोन लिटर म्हशीच्या दुधामध्ये रिफाइंड पामोलीन तेल आणि पांढऱ्या रंगाची संशयित पावडर मिसळून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रूपनवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आरोग्यास हानिकारक असलेल्या घटकांची भेसळ
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सुजाता कंपनीचा मिक्सर, त्याचे भांडे, सुमित कंपनीचा हँड ब्लेंडर तसेच भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, असा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, जप्त केलेले कृत्रिम दूध, पामोलीन तेल आणि पांढरी पावडर ही मानवी आरोग्यास अपायकारक आणि असुरक्षित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच कृत्रिम दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा खरेदीसाठी खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ओम डेअरीच्या संबंधितांशी संगनमत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली आहे.
