मुंबई आणि लोकल हे एक समीकरण आहे. दिवसेंदिवस लोकलच्या गर्दीत वाढ होत आहे. त्यामुळं लोकलमध्ये बसायला जागा न मिळणे आणि त्यावरुन होणारे वाद हे आता नेहमीचच झालं आहे. नागरिकांकडून अनेकदा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात किंवा लोकल वेळेत स्थानकात पोहोचाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वेची वाढती प्रवासी संख्या आणि गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने स्वदेशी ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणालीच्या पुढील टप्प्यातील ‘कवच 5.0’ विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या प्रणालीमुळं लोकलचा वक्तशीरपणा वाढेल. ही प्रणाली विशेषतः मुंबईसारख्या अतिवर्दळीच्या उपनगरीय रेल्वे मार्गासाठी विकसित केली जात असून, दोन लोकलमधील सुरक्षित अंतर (हेडवे) कमी करण्याची क्षमता यात असेल. त्यामुळे सध्या दर 3 मिनिटांनी येणारी लोकल येत्या काळात दर दोन मिनिटांनी उपलब्ध होणार आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे सेवांपैकी एक असून, पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर रोज तब्बल 3 हजार 254 एसी/नॉन एसी लोकल काही मिनिटांच्या अंतराने धावतात. अशा परिस्थितीत ट्रेनमधील सुरक्षित अंतर राखत त्यात आणखी कपात करण्यासाठी आणि अधिक लोकल चालविण्यासाठी ‘कवच 5.0’ महत्त्वाची ठरणार आहे. नवीन सिग्नलिंग यंत्रणा सुरु झाल्यावर लोकलची संख्या 4 हजारांपर्यंत करणे शक्य असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 11 एप्रिल 2025 रोजी ‘कवच 5.0’ची घोषणा केली होती. सध्या या प्रणालीची तांत्रिक वैशिष्ट्वे अंतिम करण्याचे काम ‘संशोधन डिझाइन आणि मानक संस्था’ (आरडीएसओ) करत आहे. सध्या भारतीय रेल्वेकडून ‘कवच 4.0’ची अंमलबजावणी सुरू असून, पश्चिम रेल्वेच्या मुंबई-दिल्ली उच्च घनतेच्या 693 मार्ग किलोमीटरवर ही प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर उपनगरीय सैर्वासाठी स्वतंत्र ‘कतच 5.0’ची अंमलबजावणी केली जाणार आहे.
स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे ट्रेनच्या हालचालीनुसार सिग्नल आपोआप बदलतात, त्यामुळे गाड्या सुरक्षित अंतर ठेवून कमी वेळेत धावू शकतात. ट्रेनने एखादा ब्लॉक व्यापताच संबंधित सिग्नल लाल आणि त्यामागील सिग्नल पिवळा होतो. ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टिमनुसार पिवळा सिग्नल आल्यावर मोटरमनने पुष्टी न दिल्यास गाडी आपोआप थांबते. लाल सिग्नल ओलांडण्याचा प्रयत्न झाल्यास ब्रेक लावून गाडी थांबते, त्यामुळे सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर मिळतो.
कवच 5.0 प्रणाली अशी असेल?
कवच 5.0 ही कॅप-आधारित सिग्नलिंग प्रणाली असल्यामुळे सध्याच्या पारंपरिक सिग्नल खांबांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. या प्रणालीमध्ये सिग्नलची माहिती थेट लोकोपायलटच्या चालक कक्षातील (कॅबमधील) डिस्प्लेवर उपलब्ध होईल. मात्र, सुरुवातीच्या संक्रमण काळात आणि आपत्कालीन पर्यायी (फॉलबँक) व्यवस्था म्हणून काही काळ सिग्नल खांब कायम ठेवले जाणार आहेत.
