दिल्लीमध्ये सध्या जंतर मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणांविरोधात आणि नीट परीक्षेतील कथित अनियमितता/पेपर लीक यांसारख्या मुद्द्यांवर सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कथित लाठीमार केला. या कारवाईच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवण्याची मागणी करत आहेत. कॉकरोच जनता पार्टीही या आंदोलनाचा भाग आहे.
बंदमध्ये कोण सहभागी?
वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 21 जुलै रोजी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबई बंदची हाक देत असल्याची माहिती दिली होती. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपविरोधी पक्षांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं. बुधवारी म्हणजेच, 22 जुलै रोजी राजभवनाबाहेर केलेल्या आंदोलनादरम्यान सुजात आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदमध्ये सामील होऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बंद मध्ये सामील होऊन हा बंद यशस्वी करावा, असे आवाहन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
कोणत्या संघटना सहभागी होणार?
आंबेडकर यांनी हे बंद पूर्णपणे शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहन केले असून समान विचारांच्या पक्षांना, विद्यार्थी संघटनांना, व्यापाऱ्यांना आणि जनतेनं या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. वंचितसह इतर पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर त्याचा वाहतुकीला मोठा फटका बसू शकतो.
काय काय बंद राहणार?
लोकांनी स्वेच्छेने बंदमध्ये सहभागी व्हावं. लोकांनी कामाला जाऊ नये, दुकान उघडू नये, ओला-उबर बंद ठेवावी. बस चालकांनी त्यांच्या बसेस बाहेर काढू नयेत ही आमची अपेक्षा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
सरकारने काही अधिकृत घोषणा केली का?
महानगरपालिका मुख्य जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी झी 24 तासला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह उपनगरातील शाळा आणि कॉलेज नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. मुंबई महानगर पालिका आणि राज्य सरकारने शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आज मुंबईतील सर्व सरकारी, महानगरपालिका आणि खाजगी शाळा असो किंवा महाविद्यालये सुरु राहणार आहेत.
मुंबईत जमावबंदी
मुंबईत 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय महाराष्ट्र पोलिसांनी घेतला आहे. शहरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र होण्यास मजाव असतो.
जमावबंदीचा परिणाम काय?
पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचा शाळा आणि कॉलेजवर काही परिणाम होत नाही, अशी माहिती महानगरपालिका मुख्य जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळेंनी दिली. हा नियम शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांच्या नियमित कामकाजावर लागू होत नाही. तसंच ही जमावबंदी व्यावसायिक अस्थापने, न्यायालये आणि सार्वजनिक वाहतूक यावर लागू होत नाही. त्यामुळे पोलिसांच्या या जमावबंदीचे आदेश शाळा आणि कॉलेजवर होणार नाही. त्यामुळे शाळा आणि कॉलेज नियमितरित्या सुरु राहणार आहेत.
शाळांचं आणि ऑफिसचं काय?
राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यात आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शाळा अथवा सरकारी कार्यायले बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच सर्व शाळा, शैक्षणिक संस्थांसोबतच सरकारी कार्यलये नियमितप्रमाणे कार्यरत असणार आहेत. सरकारकडून बंदमुळे कोणत्याही सेवा बंद असल्याचं जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सर्व सरकारी सेवा आणि कार्यालये सुरु असणार आहेत
