‘आईssबाबाss’; कुटुंबासोबत गाढ झोपेत, भल्या पहाटे बिबट्याची झडप, आई-बापासमोर चिमुकलीला शेतात ओढलं; पुण्यात लेकीचा करुण अंत

आई-वडिलांसोबत गोठ्याबाहेर झोपलेल्या ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पिंपळसुटी (ता. शिरूर) परिसरात बुधवारी (२२ जुलै) पहाटे घडली. भाग्यश्री संदीप वारे (सध्या रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे मृत मुलीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

भाग्यश्री पिंपळसुटी येथील मच्छिंद्र प्रल्हाद भोसले यांच्या शेतात ऊसतोड कामासाठी राहत होती. बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता आई-वडील आणि भाग्यश्री गोठ्याबाहेर झोपले असताना बिबट्याने तिच्यावर झडप घातली. हल्ला होताच भाग्यश्रीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आई-वडील जागे झाले आणि त्यांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र, बिबट्याने भाग्यश्रीला शेतात ओढून नेले. काही वेळानंतर शेतात भाग्यश्रीचा मृतदेह सापडला. वन विभागाने परिसरात पिंजरे लावणे, कॅमेरा ट्रॅप बसविणे, ड्रोनद्वारे पाहणी करणे आणि रात्रगस्त वाढविणे अशा उपाययोजना केल्या आहेत.

भटक्या कुत्र्याचा हल्ला

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून एक मन सुन्न करणारी आणि थरकाप उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एक आई आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या बाळाला घरात झोपवून बाहेर कपडे धुण्यासाठी गेली. बाळ झोपलेलं असल्यानं आपलं काम आटपून घेऊ, असा विचार करून आई घराबाहेर पडली खरी. मात्र, इकडे बाळासोबत जे काही घडलं, त्याची तिने कल्पनाही केली नव्हती.

बाळाचा रडण्याचा आवाज ऐकताच तिने घरात धाव घेतली. अचानक तिला समोर आपलं बाळ दिसलं. अवघ्या सहा महिन्यांची या बाळाची हाताची दोन बोटं तुटलेली होती. त्याच्या गालावर आणि संपूर्ण चेहऱ्यावर खोल जखमा होत्या, हे दृश्य पाहताच आई जोरात किंचाळली. शहरातील तहसील कार्यालय परिसरात एका भटक्या कुत्र्याने अवघ्या सहा महिन्यांच्या निष्पाप बालकावर प्राणघातक हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यात कुत्र्याने बालकाच्या हाताची दोन बोटे चावून तोडली असून, त्याच्या चेहऱ्यावरही खोल जखमा केल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *