अविवाहीत शिक्षिकेला विम्याच्या बहाण्याने आसनगावला बोलावलं, संपत्तीसाठी अक्षरश: संपवलं, मृत्यूचं मोठं गूढ उकललं

जिल्ह्यात हत्येचे सत्र थांबलेले नसून एका शिक्षिकेची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने या शिक्षिकेच्या मालमत्तेच्या कागदपत्रावर तिच्या मृत्यूनंतर वारसदार म्हणून उल्लेख करीत मृत्यूपत्र तयार केले. नंतर संबधित कागदपत्रावर जबरदस्तीने सह्या घेऊन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हत्येनंतर शिक्षिकेचा मृतदेह नाशिकमध्ये सिन्नर घोटी मार्गालगत फेकून दिला होता. या हत्येचा ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील चौकशीसाठी आरोपींना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

महिलेच्या भावाची पोलीस ठाण्यात तक्रार

आंबिवली, मोहने येथे राहणारी ५३ वर्षांची ही शिक्षिका अविवाहीत असून ती विमा एजंट म्हणून काम करत होती. १४ जुलै रोजी विमा पॉलिसीच्या कामासंदर्भात शहापूरला जात असल्याचे सांगून ती घरातून निघून गेली. नंतर घरी आली नाही. तिचा मोबाइल बंद होता. भावाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

सिन्नर-घोटी मार्गावर मृतदेह आढळला

या तक्रारीचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. तपासामध्ये तिची हत्या झाल्याची बाब स्पष्ट झाली. या शिक्षिकेचा १६ जुलै रोजी नाशिकमधील सिन्नर-घोटी मार्गालगत मृतदेह आढळून आल्याप्रकरणी नाशिक ग्रामीणच्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस निरीक्षक महेश काळे यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे दिगंबर आव्हाड (वय ४८) आणि तुषार रत्नपारखी (वय ५२) यांना ताब्यात घेतले. चौकशीत या आरोपींनी त्यांचे साथीदार संतोष जाधव (वय ४०), विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे यांच्याशी संगनमत करुन शिक्षिकेची हत्या केल्याची बाब उघड झाल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *