राणीच्या बागेतील रिकामा बंगला द्या, उपमहापौरांची मागणी धुडकावली, संजय घाडींची अश्विनी भिडेंवर नाराजी

भायखळा येथील राणीची बाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा रिकामा बंगला आपल्याला देण्याचा आग्रह उपमहापौर संजय घाडी यांनी धरला असला, तरी त्यांची ही मागणी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अमान्य केली आहे.

आयुक्तांविरोधात उघड नाराजी

राणीची बाग परिसरातील बंगला महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे उपमहापौरांनी महापालिकेच्या शहर भागातील अन्य बंगल्यांची चाचपणी सुरू केली आहे. मागणीची साधी दखलच घेतली नसल्याने त्यांनी आयुक्तांविरोधात पुन्हा एकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली.

मुंबई महापालिकेतील महापौरांचा बंगला हा भायखळ्यातील राणीच्या बागेत आहे. महापौर रितू तावडे यांनी बंगल्यात प्रवेशही केला आहे. या बंगल्याच्या लगतच महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे सेवानिवासस्थान असलेला बंगला आहे. हा बंगला मिळवण्यासाठी संजय घाडी प्रयत्नशील आहेत.

उपमहापौरांची पत्रातून मागणी आयुक्तांकडून अमान्य

यासंदर्भात त्यांनी अश्विनी भिडे यांना २५ जून रोजी पत्रही दिले. ‘मी दहिसर पूर्वेला राहत असल्याने दहिसर येथून मुंबई महापालिका मुख्यालय येथे दररोज ये-जा करताना प्रवासात बराच वेळ जातो. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुख्यालयात वेळेत पोहोचणे शक्य होत नाही,’ असे त्यांनी पत्रात नमूद केले होते, मात्र या बंगल्याची उपमहापौरांची मागणी पालिका आयुक्तांनी अमान्य केली आहे.

भायखळ्यातील तिन्ही बंगले आधीच बूक

राणीच्या बागेतील हा बंगला मिळावा, यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनीही अर्ज केला होता. त्यामुळे हा बंगला ढाकणे यांना देण्यात आला. भायखळा येथे एकूण तीन बंगले आहेत. एक बंगला महापौर यांना, दुसरा बंगला अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांना देण्यात आला. तिसऱ्या बंगल्यात या आधीच आरोग्य विभागाचे उपसंचालक राहत आहेत. त्यामुळे उपमहापौरांना बंगला मिळण्याची आशा धूसर झाली आहे. महापालिकेच्या जल विभागाचे आणखी तीन बंगले मलबार हिल, वरळी येथे आहेत. उपमहापौर त्यांची चाचपणी प्रशासनामार्फत करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *