भारतातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी EPFO नं पैके काढण्यासंदर्बातील काही नियम हे आधीच्या तुलनेत अधिकच सोपे केले आहेत. ज्यामुळं पैशांची गरज असताना पीएफची रक्कम क्लेम करणं अर्थात या रकमेवर दावा सांगत ती खात्यावर जमा करून घेणं आणखी सोपं ठरत आहे. जिथं आधी ऑफलाईन पद्धतीनं पीएफची रक्कम काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी जात होता, तिथंच आता ऑवनलाईन पद्धतीनं काही दिवसांतच हे काम पूर्ण होतं. इतकंच काय, तर एटीएमच्या माध्यमातूनही येत्या काळात ईपीएफचे पैसे काढता येणार आहेत.
पीएफ म्हणून पगारातून किती रक्कम कापली जाते?
नोकरदार वर्गासाठी पगार हा एक महत्त्वाचा घटक असतो, तर पीएफ अकाऊंटमधील रक्कम ही निवृत्तीनंतर ते अगदी आर्थिक गरजांच्या वेळी मोठा आधार देणारी ठरते. कोणाही नोकरदाराकडून मूळ वेतनाच्य 12 टक्के भाग पीएफ खात्यावर जमा केला जातो. कंपनीकडूनही तितकाच भाग पीएफ खात्यावर जमा होतो. इथं कंपनीची भागिदारी 3 भागांमध्ये होते. ज्यामध्ये .3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा होते तर, 8.33 टक्के रक्कम ईपीएस म्हणजेच एम्प्लॉयी पेंशन सर्विस आणि IDLI (इंश्योरेंस)मध्ये जमा होते.
कोणत्या कारणांसाठी काढता येते पीएफची रक्कम?
ईपीएफओच्या अटीशर्थींनुसार एकूण जमा रकमेपैकी 90 टक्के रक्कम घर उभारणीसाठी, घर डागडुजीसाठी काढता येते. कुटुंबात आरोग्यविषयक परिस्थिती आणि आर्थिक निकड असल्यास पीएफ खात्यातून पैसे काढता येतात. नियमांनुसार 7 वर्षे नोकरी केल्यानंतर तुम्ही पीएफ खात्यातून 50 टक्के रक्कम काढू शकता. याशिवाय शिक्षण, लग्न अशा कारणांसाठीसुद्धा पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.
एका महिन्यात किती वेळा काढता येते पीएफची रक्कम?
नियमांनुसार पीएफ विड्रॉलची संख्या एकसमान नसते. विविध कारणांसाठी पीएफ काढण्याचे नियमही तितकेच वेगळे असतात. काही विभागांमध्ये सदस्यांना वर्षातून एकदाच पीएफसाठी क्लेम करता येतं. तर, वैद्यकिय कारणांसाठी गरजेनुसार पीएफ क्लेम करता येतो. उदाहरणार्थ, महिन्यातून 2 ते 4 वेळाही पीएफ काढता येतो. प्रत्येक क्लेमसाठी संबंधित पात्रता, अटीशर्थी आणि इतर गोष्टींची पूर्तता आवश्यक ठरते.
कोणत्या दिवशी पीएफ क्लेम करु नये?
ईपीएफओच्या माहितीनुसार महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ते 5 तारखेला आणि महिनाअखेरील 25 ते 31 तारखेदरम्यान पीएफ क्लेम करु नये. या दिवसांना पोर्टलवर बरीच कामं सुरू असून बँक सर्व्हर डाऊन असतात. ज्यामुळं क्लेम पेंडिंग अर्थात प्रतीक्षेत राहू शकतो. नोकरी बदलण्यानंतर लगेचच किंवा सेवेत असतानाही संपूर्ण पीएफ काढू नये. यामुळं कॉर्पसवर परिणाम पडतो.
पीएफ क्लेमनंतर तो रिजेक्ट झाल्यास अनेकदा KYC त्यामागचं कारण असतं. ज्यामुळं क्लेम करताना सर्व माहितीचा तपशील पुन्हा तपासून पाहण्याचा सल्ला दिला जातो. लक्षात घ्या पीएफमधील रक्कम ही भविष्यनिर्वाह अर्थात निवृत्तीनंतरच्या जीवनासाठीसुद्धा महत्त्वाची असते. त्यामुळं वारंवार या खात्यातून पैसे काढणंसुद्धा आर्थिकदृष्ट्या योग्य नाही, जोपर्यंत गरज तितकीच महत्त्वाची असेल.
