घोडबंदर रोडवर भीषण दुर्घटना! रिक्षावर टँकर कोसळून चालकासह दोघांचा करुण अंत; एक गंभीर

घोडबंदर मार्गावरील आनंद नगर भागात गॅस टँकर रिक्षावर कोसळल्याची घटना बुधवारी घडली. या दुर्घटनेत रिक्षाचालक आणि एक प्रवासी असे दोन जण ठार झाले. तर, अन्य एक प्रवासी जखमी झाला आहे.

कळवा येथे राहणारे रिक्षाचालक दशरथ पवार (३०) हे मोहम्मद अमीन व अमजद अन्सारी या दोन प्रवाशांना घेऊन घोडबंदरच्या दिशेने जात होते. यावेळी आनंद नगर येथील डी मार्टसमोरून जाणाऱ्या गॅस टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पवार यांच्या रिक्षावर कोसळला. अपघातात पवार व अमीन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अन्सारी या अपघातातून बचावले. अपघातग्रस्त रिक्षाचा चक्काचूर झाला.

भररस्त्यात टँकर उलटल्याने ठाण्याकडून घोडबंदरच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलिस व वाहतूक कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवला. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

मृत दशरथ पवार यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. त्यांची पत्नी लहानसहान कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवते. पवार यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत अमीन हे हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते ठाण्यात कामाच्या निमित्ताने अन्सारींसमवेत आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *