नांदेड-लातूर महामार्गावरील एका उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी 9.15 ते 9.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत रस्त्यावरून जात असलेल्या दोन विद्यार्थिनी बालंबाल बचावल्या आहेत. पुलाची भिंत कोसळतानाचे हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या दुर्घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली. शहरालगत असलेल्या एसजीजीएस कॉलेजसमोर ही दुर्घटना घडली असून, पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच ही घटना घडल्याचं बोललं जात आहे.
नेमकं काय घडलं?
नांदेड आणि लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाचं काम तीन वर्षांपूर्वी केटीएल कंपनीकडून करण्यात आलं होतं. मात्र, उड्डाणपुलावरून 24 तास वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. घटनास्थळी प्रसिद्ध इंजिनिअरिंग महाविद्यालय असून विद्यार्थ्यांची नेहमीच मोठी गर्दी असते. आज सकाळी 9.15 ते 9.30 वाजेच्या सुमारास या उड्डाणपुलाचा एक मोठा भाग अचानक खचला आणि भिंत कोसळली. ज्यावेळी ही भिंत कोसळली, त्याच सेकंदाला तिथून स्कुटीवरून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी कॉलेजला जात होत्या. भिंतीचा ढिगारा अंगावर येताच दोन्ही मुली स्कुटीसह खाली पडल्या. मात्र, सुदैवाने या घटनेत दोन्ही मुलींनी स्वतःचा जीव वाचवत बालंबाल बचावल्या असून एक मोठी जीवितहानी टळली आहे.
कंपनीकडून अजब दावा…
या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. रस्त्यावर साचलेला माती आणि सिमेंटचा ढिगारा जेसीबीच्या साहाय्याने हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. या उड्डाणपुलासाठी कोट्यवधींचा खर्च करुन अवघ्या तीन वर्षांतच उड्डाणपुलाची भिंत कोसळल्यानं बांधकाम कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, भिंत कोसळतानाचा आणि मुली थोडक्यात बचावल्याचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मध्यरात्री झालेल्या भुंकपामुळे उड्डाणपुलावरील भिंतीला तडे गेले, त्यामुळे ही घटना घडल्याचा अजब दावा केटीआयएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे.
