एकीकडे देश प्रगतीचे आणि डिजिटल क्रांतीचे दावे करत असताना, दुसरीकडे ग्रामीण भागात रस्ते आणि आरोग्य व्यवस्थेचे अत्यंत विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका वयोवृद्ध रुग्णाला उपचारासाठी चक्क रुग्णवाहिकेऐवजी बैलगाडीतून नेण्याची दुर्दैवी वेळ आली. मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता चिखलमय झाल्यानं उपचारासाठी निघालेले डॉक्टर अर्ध्या वाटेतच अडकले. अखेर एका हतबल मुलाने आपल्या आजारी वडिलांना बैलगाडीत बसवून तीन किलोमीटरचा खडतर प्रवास करत डॉक्टरांचं ठिकाण गाठलं.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील रुईखेडा येथील रहिवासी असलेले वयोवृद्ध रुस्तुम दहातोंडे यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं पाहून त्यांचे सुपुत्र रामू दहातोंडे यांनी तातडीने उपचारासाठी हतनूर येथील डॉ. विवेक अकोलकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना गावी येण्याची विनंती केली. डॉ. अकोलकर यांनीही तत्परता दाखवत दुचाकीवरून रुईखेडा गावाकडे धाव घेतली. मात्र, हतनूर ते रुईखेडा या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे प्रचंड चिखल साचला होता. चिखलाचे साम्राज्य इतकं होतं की डॉक्टरांना दुचाकी चालवणं अशक्य झालं आणि त्यांना अर्ध्या वाटेवरच थांबावं लागलं.
तीन किलोमीटरचा चिखलमय प्रवास अन् बैलगाडीत उपचार…
डॉक्टर चिखलामुळे पुढे येऊ शकत नसल्याचं समजताच रामू दहातोंडे यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. वडिलांचा जीव वाचवणं गरजेचं असल्यानं त्यांनी कोणतीही वेळ न घालवता तत्काळ आपल्या बैलगाडीची व्यवस्था केली. आजारी रुस्तुम दहातोंडे यांना बैलगाडीत झोपवून रामू यांनी चिखल तुडवत तब्बल तीन किलोमीटरचं अंतर पार केलं आणि जिथे डॉक्टर थांबले होते तिथे वडिलांना पोहोचवले. रस्त्यावरच बैलगाडी उभी करून डॉ. विवेक अकोलकर यांनी वयोवृद्ध रुस्तुम दहातोंडे यांच्यावर प्राथमिक उपचार केले.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा खिळखिळ्या
विशेष म्हणजे, हतनूर-रुईखेडा या रस्त्याचं काम शासकीय स्तरावर मंजूर झालेलं आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे आणि संथ कारभारामुळे हे काम अद्यापही रखडलेलेच आहे. रस्ता मंजूर होऊनही जर वेळेत काम पूर्ण होत नसेल आणि आपत्कालीन स्थितीत नागरिकांना रुग्णवाहिकेऐवजी बैलगाडीचा आसरा घ्यावा लागत असेल, तर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा किती खिळखिळ्या झाल्या आहेत, हेच यावरून स्पष्ट होते. या गंभीर प्रकारामुळे कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
