दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. विविध दुकानांवर धाडी टाकण्यात येत असताना आता एफडीएने थेट मोठ्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी इंदापूर आणि मंचर परिसरातील दोन बड्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. यापूर्वी कारवाई झालेल्या दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र (चिलिंग सेंटर) किंवा संबंधित आस्थापनांकडून या कंपन्या दूध खरेदी करतात का, त्यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध आहे का, तसेच भेसळयुक्त दूध पुरवठ्याशी काही सबंध आहे का, याची पडताळणी करण्यासाठी तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘एफडीए’च्या पथकाने दूध खरेदीच्या नोंदी, पुरवठादारांची माहिती, गुणवत्ता याबातची तपासणी केली. ही मोहीम आणखी दोन दिवस सुरू राहणार असून, त्यानंतर मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एफडीए आणि पोलिस प्रशासनाने रविवारी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांतील १३ आस्थापनांवर धाडी टाकून कारवाई केली होती. तपासात पाणी, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे (डेअरी परमिएट) पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट किंवा शाम्पू, पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार केले जात होते. हे कृत्रिम दूध नैसर्गिक दुधात मिसळून बाजारात विकले जात असल्याचे तपासात उघड झाले होते, असे ‘एफडीए’च्या पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाले होते.
