आक्राळविक्राळ पाऊस अन् जीवघेणी हवा, वृक्ष कोसळले, जखमी पांडुरंगांची झुंज अपयशी, भुवड कुटुंबावर दु:खाचा डोंगर

ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड यांचा गुरुवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून भुवड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही वृक्ष पडझडीत सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी दोषींवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत भुवड कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

नेमकी घटना कशी घडली?

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयानजीक धर्मवीर नगर येथे राहणारे पांडुरंग भुवड हे सोमवारी ६ जून रोजी नळ दुरुस्तीच्या कामासाठी चालत जात होते. यावेळी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु झाल्याने आरटीओ कार्यालयासमोर एका झाडाच्या आडोशाला भुवड उभे असतानाच त्यांच्यावर झाड कोसळले.

त्यांना तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात होती. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबाचा आधार हरपला

भुवड यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली आहेत. भुवड यांना प्लम्बिंगच्या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा हाकला जात होता. आता वडिलांच्या अकस्मात मृत्यूने भुवड कुटुंबाचा आधार हरपला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंबाला आर्थिक मदत

वृक्ष पडझडीत जखमी भुवड यांना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले – जाधव यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर रेपाळे आणि जाधव यांनी तात्काळ ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त राव यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत भुवड कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

महासभेत याप्रश्नी ठराव मंजूर करुन भुवड कुटुंबाला आर्थिक मदत आणि त्यांच्या वारसाला ठाणे पालिकेत नोकरी देण्यात येईल, याप्रश्नी उपमुख्यमंत्री शिंदे यांची आयुक्त राव व महापौर पिंपळोलकर यांच्याशी चर्चा झाल्याचे रेपाळे यांनी सांगितले. भुवड कुटुंबाला वैयक्तिकरित्या आर्थिक मदत देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *