आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर भेसळखोरांवर धाडसत्र सुरू असून राजधानी मुंबईतही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील दहिसर परिसरात दूध भेसळीविरोधात धडक कारवाई करून एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच दहिसर पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ४७० लीटर दूध नष्ट करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिसरमध्ये नामांकित कंपनीच्या दूधाचे पाऊच फोडून भेसळ केली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटे ४.४५ वाजता अन्न व औषध प्रशासन व गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्र. १२, दहिसर (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने धाड टाकण्यात आली. यावेळी लिंगय्या भिक्षमया गणता (वय ४२ वर्षे, खोली क्रमांक बी-३, दुबे चाळ क्रमांक २, राजेश कंपाउंड जवळ, दहिसर पूर्व, मुंबई) हा भेसळ करताना आढळून आला. सदर आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एकूण ३ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
तपासात पुढं असंही निष्पन्न झालं आहे की, शिवकृपा दूध डेअरी येथून दूध मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी तसेच पंचमहाल सहकारी दूध उत्पादन संघ,गोध्रा, गुजरात इथं पुरवलं जात होते. या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात दुधात भेसळ करणाऱ्या राजेंद्र जाधव (संकलन केंद्र मालक), योगेश लहाने (हजर व्यक्ती), तसंच शिवकृपा दूध डेअर, फुलंब्री यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलमे ३(५), ६१, १११, १२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६, २७, 3(9)(zz)(iv) व ५९ अन्वये फुलंब्री पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल क्र. ०३५५/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
