घोटभर पाण्यासाठी कासावीस; कल्याणमध्ये 96 तास पाणीपुरवठा बंद, टँकरचालकांकडून लूट

 मुसळधार पावसामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ साचून रविवारी रात्री कल्याणचा पाणीपुरवठा बंद झाला. तर दुसऱ्या दिवशी १,३२१ मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरावर पाणी संकट कोसळले. फुटलेल्या जलवाहिनीची मागील ७२ तासांपासून दुरुस्ती सुरू असून शहरातील नागरिकांची पाण्यावाचून अक्षरश: तडफड होत आहे. पिण्याचे पाणी खरेदी करण्यासाठी दुकानात झुंबड उडाली आहे.

एकीकडे सलग ७ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेले असताना कल्याण डोंबिवली शहराला मात्र घोटभर पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेच्या मोहिली १०० एम एलडी आणि मोहने १४४ एमएलडी या दोन्ही पम्पिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले. गाळाचा उपसा होईपर्यंत हे दोन्ही प्लांट बारा तास बंद ठेवावे लागले. त्यानंतर मोहिलीचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यामुळे कल्याणातील योगीधाम, रामबाग यासह डोंबिवली शहराला पाणी उपलब्ध झाले असले, तरी कल्याण पूर्व पश्चिम शहर मात्र तहानेने व्याकूळ झाले.

मोहने पम्पिंग स्टेशन कडून बारावे प्लांटकडे जाणारी मुख्य जलवाहिनी नदी पात्रात फुटली. सलग दोन दिवस नदी पात्रातील पाण्याच्या वेगवान प्रवाहांमुळे दुरुस्तीत अडथळे निर्माण झाले. केडीएमसीच्या जलवाहिनी लगत असलेल्या स्टेमच्या १८५० मिमी व्यासाच्या नव्या जलवाहिनीला केडीएमसीची जलवाहिनी कापून जोडण्यात आली. हे काम मागील दोन दिवसांपासून अहोरात्र सुरू होते. तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जलवाहिनी दुरुस्तीसाठी ठाण मांडून बसले होते.

वापरासाठी लागणारे पाणी मिळविण्यासाठी टँकरचा आधार घेतला जात असला, तरी टँकरचालकांनी दोन ते अडीच हजारात बोअरिंग किंवा विहिरीच्या पाण्याचा टँकर देत नागरिकांची लूट चालवली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी पावसाच्या पाण्याचा वापर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *