चर्चगेट स्थानकात लोकल थेट फलाटावर आल्याने झालेल्या लोकल कल्लोळानंतर बुधवारी सीएसटी स्थानकातही ही भयानक घटना घडणार होती. मात्र, चर्चगेट अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानकात लावण्यात आलेल्या ‘एडब्ल्यूएस’ (ऑक्झिलरी वॉर्निग सिस्टीम) मुळे लोकलचे आपत्कालीन ब्रेक लागल्याने लोकल जागेवरच थांबून मोठा अनर्थ टळला.
कसा-याहून आलेल्या लोकलचा वेग सीएसटी स्थानकात फलाट क्रमांक ६ वर प्रवेश करताना प्रती तास १० किमीहून अधिक असल्याची नोंद एडब्ल्यूएस यंत्रणेमध्ये झाल्याने ही यंत्रणा कार्यान्वित झाली आणि त्वरित लोकलचे आपत्कालीन ब्रेक लागले. या लोकलचा वेग १० ऐवजी ११ ते १२ किमी प्रती तास झाला होता.
काय आहे एडब्ल्यूएस यंत्रणा?
अनवधानाने किंवा मानवी चुकांमुळे लोकलचे ब्रेक न लागल्यास ठरवून दिलेल्या वेगापेक्षा अधिक वेग असल्यास ही यंत्रणा कार्यान्वित होते. या प्रणालीत मोटरमनला पुढच्या सिग्नलविषयी लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्यांमधून माहिती मिळते.
लाल दिव्यासाठी १५ किमी प्रती तास(सीएसटी १० किमी), दोन पिवळे वा हिरव्यासाठी ७० किमीचे बंधन आहे. त्यापेक्षा जास्त वेगाने गाडी धावल्यास विशिष्ट बेल वाजते. त्यानंतर चार सेकंदात वेग कमी न झाल्यास आपसूकच ब्रेक लागतात.
मध्य रेल्वेवरील सीएसटी, ठाणे, पनवेल, कर्जत, खोपोली, कल्याण, कसारा या स्थानकांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.