पोलीस कोठडीत असलेला पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल याच्याबरोबर छायाचित्र काढण्याचा प्रकार तेथील दोन पोलीस कर्मचा-यांना चांगलाच महाग पडला आहे. हार्दिक पटेल बरोबर छायाचित्र काढल्याप्रकरणी या दोन्ही पोलीस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे.
कॉन्स्टेबल महेंद्रसिंह जीवनसिंग आणि हेड कॉन्स्टेबल अरुण दळे अशी या दोघांची नावे आहेत.
त्या दोघांची हार्दिक पटेल बरोबर काढलेली ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हॉट्स अॅप आणि फेसबूकच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर सरकारने त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केली.
हार्दिकला २३ ऑक्टोबर रोजी अटक केली असून तो क्राईम ब्रँच पोलिसांच्या ताब्यात आहे. कोणत्याही आरोपीबरोबर फोटो घेणे हा पोलिसांसाठी गुन्हा असून, या प्रकरणाची चौकशी करूनच ते दोघेही दोषी आढळल्याने हा निलंबनाच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त दीपन भाद्रन यांनी सांगितले.