नाना पाटेकर की कॅप्टन मच्छार? विद्याविहार पुलाच्या नामकरणावरुन राजकारण तापलं, महापौरांकडून भूमिका स्पष्ट

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला असतानाच त्याच्या नामकरणावरून शिवसेना (उबाठा) पक्ष आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

या पुलाचे लोकार्पण होण्यापूर्वीच शुक्रवारी सकाळी ‘उबाठा’ पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुलावर पद्मश्री नाना पाटेकर यांच्या नावाचा फलक झळकावला. दुसरीकडे, ‘या पुलाला विमान प्रवाशांचे जीव वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचे नाव द्यावे’, अशी मागणी भाजपचे आमदार पराग शहा यांनी महापालिकेकडे यापूर्वीच केली आहे. त्यामुळे पुलाच्या नामकरणावरून राजकीय वाद तापण्याची चिन्हे आहेत.

रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणारा हा दोन मार्गिकांचा उड्डाणपूल आहे. त्याची एकूण लांबी ६५० मीटर असून, त्यापैकी रेल्वे रुळांवरील भाग सुमारे १०० मीटर लांबीचा आहे. या उड्डाणपुलावरून विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पदपथांवर जाण्यासाठी जोडमार्गाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दोन्ही बाजूंच्या रेल्वे तिकीट खिडकी कक्ष, स्थानक मास्तर कार्यालय आणि जिन्यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. रेल्वे हद्दीत जिन्याद्वारे पादचारी मार्ग उपरस्त्याला जोडण्यात आला असून, पुलावर ध्वनिरोधकही बसवण्यात आले आहेत.

शिवसेना उबाठा पक्षाने महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन मागणीपत्र दिले असून, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाही निवेदन सादर केले आहे. भाजपचे आमदार पराग शहा यांनी या पुलाला कॅप्टन स्मित मच्छार यांचे नाव देण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. नामकरणाचे राजकारण कुणीही करु नये, पुलाला नाव कुणाचे द्यायचे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि आपण एकत्र बसून निर्णय घेऊयात, महापौर रितू तावडे यांनी प्रतिक्रिया दिली.

नानांचे कार्य व्हावे अधोरेखित
चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच नाम फाऊंडेशनद्वारे शेतकरी व गरजूंसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून नाना पाटेकर यांच्या नावाने पुलाचे नामकरण करावे, अशी मागणी केल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रकाश वाणी यांनी सांगितले. या मागणीच्या समर्थनार्थ शुक्रवारी पुलाच्या दोन्ही बाजूंना फलक लावण्यात आले.

सुपुत्राचा गौरव व्हावा
‘कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचा गौरव जगभरात होत आहे. घाटकोपरचे रहिवासी असलेल्या या भारतमातेच्या सुपुत्राचा गौरव व्हावा म्हणून मी त्यांचे नाव उड्डाणपुलाला देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे दिला होता. अखेर त्यांन घ्यायचा आहे. त्यामुळे नामकरणाच्या वादात मी पडू इच्छित नाही’, असे शहा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *