महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उष्ण आणि दमट हवामानाने घाम काढला आहे. आता हवामानात पुन्हा मोठा उलटफेर जाणवत आहेत. काही भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहील, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता
पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील ३ दिवस हवामानाची अशीच स्थिती कायम राहील. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. या भागात पावसाचा विशेष अलर्ट नसला, तरी तापमानात वाढ झाल्यानं उष्णतेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज
अहिल्यानगर जिल्ह्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर या भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली येथे हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. नांदेड आणि लातूरमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, तर धाराशिव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता
विदर्भातील जिल्ह्यांसाठी सध्या पावसाचा विशेष अलर्ट नसून, बहुतांश ठिकाणी कोरडे, उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत काही भागांत हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांत अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भातील जिल्ह्यांसाठी सध्या पावसाचा विशेष अलर्ट नसून, बहुतांश ठिकाणी कोरडे, उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
