२०१८ मध्ये वांद्रे येथील एका उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची हत्या करून त्यांच्या घरी दरोडा टाकल्याप्रकरणी केअरटेकर आणि तिच्या प्रियकराला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा देण्याची मागणी फेटाळून लावली आणि म्हटले की, हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ श्रेणीत येत नाही.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. बोहरा यांनी केअरटेकर पार्वती खाका (२६) आणि तिचा प्रियकर सिंहासन एक्का (२६) यांना नानक (८५) आणि दया मखिजानी (८१) यांची हत्या केल्याप्रकरणी आणि दरोडा टाकताना दुखापत केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याव्यतिरिक्त, पार्वतीवर नोकर म्हणून चोरी केल्याबद्दल सात वर्षांची सक्तमजुरी, तर एक्का याच्यावर घरात बेकायदेशीर प्रवेश केल्याबद्दल १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगव्या लागतील.
सरकारी पक्षाची फाशीची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. न्यायालयाने नमूद केले की, हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ श्रेणीत येत नाही; विशेषतः कारण हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. तसेच, न्यायालयाने कारागृहातील आरोपींचे वर्तन आणि त्यांच्या सुधारणेची शक्यता यांचाही विचार केला.
उच्चभ्रू परिसरात राहणारे वृद्ध जोडपे
हे वृद्ध दाम्पत्य वांद्रे पश्चिम येथील ‘एकता एलीट, कोकिलकुंज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’मध्ये एकटेच राहत होते, कारण त्यांची मुले आणि इतर कुटुंबीय परदेशात स्थायिक होती. हत्येच्या अवघ्या १५ दिवस आधीच पार्वती त्यांच्याकडे पूर्णवेळ केअरटेकर म्हणून कामावर रुजू झाली होती.
२१ जून २०१८ रोजी, घरातील मोलकरीण सुरेखा साबळे हिने दाम्पत्याच्या फ्लॅटचा दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने वॉचमन विमलेश यादव याला सतर्क केले. त्यानंतर भागवत, यादव, समरंजन मोंगा आणि सुरेखा यांनी फ्लॅटकडे धाव घेतली. इमारतीतील स्वच्छता कर्मचारी सुभाष खेतले याने स्वयंपाकघराच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करुन मुख्य दरवाजा उघडला.
घरात दोघांची हत्या, सामान अस्ताव्यस्त
आत गेल्यावर नानक आणि दया हे बेडवर मृतावस्थेत आढळले. त्यांचे हात आणि गळे एका ओढणीने बांधलेले होते. दयाच्या पायाजवळ रक्ताने माखलेली उशी पडलेली होती. कपाटे उघडी होती आणि घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. सुमारे १० लाख रुपये किमतीचे आर्टिफिशिअल, चांदीचे आणि सोन्याचे दागिने, तसेच ९ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती.
पोलिसांनी २२ जून २०१८ रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरुन पार्वती आणि एक्का यांना अटक केली. त्यावेळी ते ‘गीतांजली एक्सप्रेस’ने ओडिशच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांच्याकडून दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या, तसेच २१ जून रोजी पहाटे ५:१९ वाजता काढलेली दादर-झारसुगुडा रेल्वेची दोन तिकिटेही सापडली.
पार्लर मालकिणीची साक्ष महत्त्वाची
न्यायालयाने साक्षीदारांच्या जबाबांवर, सीसीटीव्ही फूटेजवर, वैद्यकीय निष्कर्षांवर, जप्त केलेल्या वस्तूंवर आणि आरोपींच्या वर्तनावर आधारित निर्णय दिला. ब्युटी पार्लरच्या मालकीण सुयहा चिन यांनी साक्ष दिली की, हत्येच्या काही तास आधी, २० जून रोजी पार्वती ही दयासोबत त्यांच्या सलूनमध्ये आली होती. रिक्षाचालक लवकुश राजभर याने पार्वती आणि एक्का यांना ओळखले; त्यानेच त्यांना वांद्रे पुलाजवळ सोडले होते, कारण त्यांनी दादरला जाण्यासाठी रिक्षा केली होती.
लास्ट सीन थिअरी
सरकारी वकील केशव साळुंखे यांनी ३५ साक्षीदारांचे पुरावे सादर केले. न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्षाने ‘लास्ट सीन थिअरी’ (गुन्ह्याच्या वेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित होते, हे दर्शवणारा सिद्धांत) सिद्ध केली आहे. तसेच, स्वयंपाकघराच्या खिडकीतून तिसरी व्यक्ती आत आली असावी, हा बचाव पक्षाचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला.
आरोपींचा दावा फेटाळला
पार्वतीचा असा दावा होता की, ओडिशामध्ये तिची आई आजारी असल्याचे समजल्यावर ती तिथून निघून गेली होती; दया आणि नानक यांनी तिला जाण्याची परवानगी दिली होती आणि २ हजार रुपयेही दिले होते. एक्कानेही असाच बचाव मांडला. मात्र, न्यायाधीशांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. न्यायालयाने नमूद केले की, पार्वतीनेच एक्काला मुंबईत बोलावले होते आणि त्याला फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. शिवाय, पार्वती निघून जात असताना त्या दोघांपैकी कोणीही इतर कोणालाही याची कल्पना दिली नव्हती.
