चुकून पाकिस्तानात गेलेली गीता १० वर्षांनी भारतात परतली

दशकभरापूर्वी चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली मूकबधिर मुलगी गीता सोमवारी सकाळी भारतात परतली. सकाळी साडेदहाच्या सुमारास दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गीताचे आगमन झाले.

गीता सोबत मागच्या दहावर्षांपासून तिचा सांभाळ करणारे ईदी या समाजसेवी संस्थेचे सदस्य आले आहेत. गीताचे आगमन झाले त्यावेळी दोन्ही देशांच्या दूतावासांचे अधिकारी विमानतळावर उपस्थित होते.

गीता आता २३ वर्षांची असून, लहान असताना चुकून सीमारेषा ओलांडून ती पाकिस्तानात गेली होती. गीताचे कुटुंब बिहारमध्ये रहाते. तिची आधी डीएनए चाचणी केली जाईल. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतरच तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले जाईल.

गीताचे डीएनए जुळले नाही तर, अशा स्थितीत तिच्याशी संवाद साधण्यासाठी परराष्ट्रमंत्रालयाने दोन संस्थांची निवड केली आहे. दहावर्षांपूर्वी लाहोर रेल्वे स्थानकात थांबलेल्या समझौता एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी रेंजर्सना गीता सापडली होती.

जालधंर जवळच्या करतारपूर येथून ती बेपत्ता झाली होती. ती बैसाखी सणासाठी तेथे गेली होती. त्यावेळी गीताचे वडिल पंजाबमध्ये गवंडी म्हणून काम करत होते. पाकिस्तानी रेंजर्सनी तिला ईदी या संस्थेकडे सोपवले.

या संस्थेचे सदस्य गीताचा संभाळ करत होते. गीता मूकबधिर असल्यामुळे तिला आपल्याविषयी माहिती देता येत नव्हती. फक्त भारताचा नकाशा पाहिल्यानंतर ती भावूक व्हायची. सलमान खानचा बजरंगी भाईजना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गीताची माहिती समोर आली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने गीताच्या कुटुंबियांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *