नाशिकमधील कामगार नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गर्लफ्रेंडच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर आणि गर्लफ्रेंडने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून बॉयफ्रेंडने थेट अपहरणाचा कट रचला. तरुणीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत तिला जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न प्रियकराकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आनंद राजभर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आनंद राजभर आणि संबंधित तरुणी यांच्यात प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मात्र, तरुणीच्या पालकांनी लग्नास नकार दिला आणि प्रियकर आनंद याला ही गोष्ट सहन झाली नाही. त्यानंतर त्याने हा राग आपल्या मनात ठेवला. तरुणीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर तरुणीने देखील आनंद याच्यासोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आणण्यास सुरुवात केली. तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. आनंदचा पारा अजून चढला. संतापात असलेल्या आनंदने ‘तू माझी नाही तर, दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही’, या विकृत मानसिकतेतून तीन मित्रांना तरुणीच्या मागावर पाठवले होते. त्याचे मित्र देखील पीडित तरुणीवर पाळत ठेवत होते.
डोळ्यात मिरचीची पूड टाकून हल्ला
त्यानंतर ही तरुणी सातपूरच्या कामगार नगर येथील किराणा दुकानात आली आणि त्याचवेळी तिच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला रस्त्यात अडवलं आणि तिच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हल्ला करत तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत या संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कसाबसा या तिघांनी तेथून पळ काढला.
आनंद राजभरला अटक
पीडित युवतीने याबाबत तात्काळ आपल्या पालकांसोबत सातपूर पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य संशयित आनंद राजभर याला अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. नाशिकमध्ये घडलेली ही घटना म्हणजे प्रेमसंबंधातील मतभेद इतकं टोकाचं रूप धारण करणे ही चिंतेची बाब आहे.
