अवकाळीचा मराठवाड्याला दणका; हाता-तोंडाशी आलेली पिकं क्षणात जमीनदोस्त

मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. लातूर, बीड, परभणी, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांत रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दोन दिवस चाललेल्या या पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा पिके जमिनीवर आडवी पडली. अनेक ठिकाणी फळबागाही बाधित झाल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार हजारो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासनाने मदतीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लातूरमध्ये सर्वाधिक फटका

लातूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले असून कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे 15,000 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. औसा तालुक्यातील कारला गावातील शेतकरी रंगराव काळे यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. कुटुंबाच्या मदतीने उभे केलेले पीक एका रात्रीत जमीनदोस्त झाले. आता पुढील पेरणी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. शेतकरी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत.

नांदेड आणि हिंगोलीतही हानी

नांदेड जिल्ह्यातील मुखेड, कंधार आणि हिमायतनगर तालुक्यांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत तालुक्यांत हरभरा, गहू आणि ज्वारीची पिके आडवी पडली. हिंगोलीतील शेतकरी सोपान शिंदे यांनी तात्काळ सर्वेक्षणाची मागणी केली आहे. जिल्हानिहाय प्राथमिक अंदाजानुसार परभणीमध्ये 4,900 ते 5,000 हेक्टर, बीडमध्ये 3,400 ते 3,409 हेक्टर, धाराशिवमध्ये 40 ते 50 हेक्टर आणि नांदेडमध्ये 70 ते 80 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

अधिवेशनातही प्रश्न

या नुकसानीचा मुद्दा अधिवेशनातही उपस्थित झाला. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *