नवी मुंबई विमानतळावरून सहा शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगोन येत्या 29 मार्चपासून अहमदाबाद, गोवा, राजकोट, बेळगाव, कोल्हापूर आणि दीवसाठी थेट विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
विमानतळाचा विस्तार
विमानतळाच्या अधिकृत घोषणेत याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यामुळे विमानतळापासून टियर-2 आणि टियर-3 शहरांनाही जोडणी मिळणार आहे. या विमानसेवा एटीआर विमानांचा वापर करून या सहा शहरांदरम्यान चालवल्या जाणार आहेत. शिवाय मार्च अखेरीस नवी मुंबई विमानतळाचं उन्हाळी वेळापत्रकही सुरू होईल. यामध्ये बऱ्याच नव्या फ्लाइट्स सुरू केल्या जातील. दररोज सुरू होणाऱ्या या उड्डाणांमुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
गुजरात आणि मुंबईमधील कनेकटीव्हीटी वाढवण्यासाठी इंडिगोकडून या विमानसेवा सुरू करण्यात येणार आहेत. अहमदाबादहून, हे विमान दररोज संध्याकाळी 7.10 वाजता निघेल आणि नवी मुंबईत रात्री 8.40 वाजता उतरेल. परतीचे विमान रात्री 9.10 वाजता निघेल आणि अहमदाबादला रात्री 10.35 वाजता पोहोचेल.
राजकोटसाठी सकाळी विमानसेवा सुरू होणार आहे. नवी मुंबईहून सकाळी 7 वाजता निघणारी विमान सेवा राजकोटला 8.15 वाजता पोहोचेल. परतीचा प्रवास सकाळी 8.45 वाजता उडेल आणि नवी मुंबईला 9.45 वाजता पोहोचेल.दीव सेवा दररोज सुरू राहील, नवी मुंबईहून सकाळी 10.05 वाजता निघेल आणि सकाळी 11.15वाजता पोहोचेल आणि परतीचा प्रवास सकाळी 11.40 वाजता सुटेल.
24 तास विमान सेवा
दरम्यान, बेळगाव आणि कोल्हापूर विमानसेवेचं वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिवाय, 1 फेब्रुवारीपासून, नवी मुंबई विमानतळावर 24 तास विमान उड्डाणांना सुरुवात झाली आहे. त्यानुसार आता वेळापत्रकामध्ये फ्लाइट्सची वाढ करण्यात येणार आहे. हे नवीन मार्ग इंडिगोच्या एनएमआयएमधील विस्तारित ऑपरेशन्सचा भाग आहेत आणि टियर-2 आणि टियर-3 शहरे आणि मुंबई प्रदेशादरम्यान पर्यटन आणि व्यावसायिक प्रवासाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवतात.
नवी मुंबई विमानतळावर 25 डिसेंबर 2025पासून विमान सेवांना सुरुवात झाली आहे. तेव्हापासून नागरिकांचा या विमानतळाला उदंड प्रतिसाग मिळत असून लवकरच मालवाहतूक सेवाही सुरू होणार आहे.
