२५ वर्षे यशस्वी वाटचाल करणा-या कोकण रेल्वेला २०१४-१५ मध्ये ३९ कोटी ३९ लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. तर अपघात टाळण्यासाठी १६ हजारांपेक्षा अधिक ठिकाणांचे फेल्युअर काढण्यात आले आहेत. कोकण रेल्वेची माल वाहतूक सेवा असलेल्या रो-रो तूनही रेल्वेला ७३ कोटी ३० लाखांचा निव्वळ नफा झाला आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात ९७२ कोटी ६१ लाख रुपयांची उलाढाल केली. मागील वर्षी ही उलाढाल ९३२ कोटी ९५ लाख इतकी होती. यंदा कोकण रेल्वे प्रशासनाने ४१ कोटी ३७ लाख रुपये पेन्शन पोटी भरले आहेत. तर ऑगस्ट २०१५ पर्यंत ७१ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम बाँडपोटी परत करण्यात आली आहे.
गतवर्षी रेल्वेला मिळणा-या नफ्यामध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर या वर्षी आतापर्यंत १५ कोटी ८७ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सिद्धेश्वर तेलगु यांनी दिली. कोकण रेल्वे प्रशासनाने कोलाड ते इंदापूर यादरम्यान मालवाहतुकीसाठी रो-रो सेवा सन १९९९ पासून कार्यान्वित केली. रेल्वे गाडयातून मालवाहू ट्रक नेले जात आहेत.
दिवसेंदिवस या सेवेला व्यवसायिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून; नुकत्याच संपलेल्या २०१४-१५ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला ५५ हजार ९२१ ट्रक वाहतुकीमधून ७३ कोटी १६ लाख रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षी हेच उत्पन्न ६७ कोटी २० लाख इतके होते.