1 जुलै पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. तर अनेक ठिकाणी धरणांनी तळ गाठल्याने पाणी टंचाईचं संकट सुद्धा उभं राहिलं होतं. मात्र आता 1 जुलै पासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुणे वेधशाळेने 1 ते 3 जुलैदरम्यान राज्यभर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे 3 जुलै रोजी कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकण विभागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्रकिनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

कोकणाला पावसाने झोडपलं : 

राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रत्नागिरी जिल्ह्यातील कुळवंडी येथे राज्यातील सर्वाधिक 235 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असून रत्नागिरी जिल्ह्यातील कुळवंडी येथे राज्यातील सर्वाधिक 235 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ याच जिल्ह्यातील वेळवी येथे 211 मिलिमीटर, तर मुरडव येथे 203 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे कोकणातील अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. 30 जून  कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

30 जून ते 3 जुलै दरम्यान गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथे 350 ते 500 मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो. मुंबई, पालघर आणि आसपासच्या परिसरात एकूण 350 ते 600 मिमी पावसाचा अंदाज आहे. सुरुवातीला किनारपट्टीवर जास्त पाऊस होईल, तर आठवड्याच्या मध्यापासून कल्याण-डोंबिवली आणि शहापूरच्या अंतर्गत भागात जोर वाढेल. मध्य महाराष्ट्र, पुणे आणि मराठवाडा या भागात आठवडाभरात वादळी पावसाची शक्यता असून 50 ते 150 मिमी पावसाची नोंद होऊ शकते.

मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी : 

मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे 110 मिलिमीटर, महाबळेश्वर येथे 83 मिलिमीटर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेळगी येथे 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, मंचर व न्हावरा, लोणावळा, जुन्नर, नारायणगाव, राजगुरूनगर, सोलापूर जिल्ह्यातील वळसिंग, मंद्रुप, मोहोळ, पुळूज तसेच सातारा, सांगली, अहिल्यानगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला.

कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेर्डी येथे 197 मिलिमीटर, धामनंद येथे 192 मिलिमीटर आणि बारने येथे 190 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय रायगड जिल्ह्यातील महाड, तुडील, इंदापूर, निझामपूर, कोलाड, रत्नागिरी जिल्ह्यातील कळकवणे, मंडनगड, आंजर्ला, चिपळून, देवरूख, देवगड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि पालघर जिल्ह्यातील बोईसर येथेही जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला. हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे 89 मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यातील मांडवा येथे 78 मिलिमीटर आणि परभणी जिल्ह्यातील पिंपळधरी येथे 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात ही हलका ते मध्यम पाऊस झाला. विदर्भातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातील फुलसांवगी येथे 95 मिलिमीटर, हिवरा येथे 77 मिलिमीटर आणि कुरली येथे 72 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *