कपाळी गंध-बुक्का, डोईवर तुळस, हाती टाळ, मृदंग आणि मुखी निवृत्तिरायासह पांडुरंगाच्या नावाचा अखंड जप, अशा भक्तिपूर्ण वातावरणात संत निवृत्तिरायांनी पाडुरंगाच्या भेटीसाठी सोमवारी (दि. २९) त्र्यंबकनगरीहून प्रस्थान ठेवले.
नारळ प्रसादाचा कार्यकम
सोमवारी सकाळपासून संत निवृत्तिनाथ मंदिर परिसरात पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी तयारी सुरू झाली. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नारळ प्रसादाचा कार्यकम झाला. पालखीसाठी आलेले मानकरी ह. भ. प. मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर यांसह कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते या स्थानिक नेत्यांसह मुंबईहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते अमित ठाकरे यांनीही पालखी प्रस्थानासाठी हजेरी लावली. संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. माधवदास राठी महाराज यांच्यासह सर्व विश्वस्त, पुजारी ह. भ. प. जयंत महाराज गोसावी आदींची उपस्थिती होती.
नयनमनोहरी सोहळा भक्तांनी अनुभवला
दुपारी अडीचच्या सुमारास पालखी नाथांच्या संजीवन समाधी मंदिरापासून पुढे निघाली. भगव्या पताका, सजवलेले अश्व, नगाऱ्याचा रथ असा डोळ्यांचे पारणे फेडणारा नयनमनोहरी सोहळा भक्तांनी अनुभवला. यावेळी पालखी प्रस्थान मार्ग बदलण्यात आला होता. चौकीमाथा तसेच तेलीगल्ली या परिसरातील ग्रामस्थांनी प्रथमच या मार्गे पालखी प्रस्थान होत असल्याने आनंद व्यक्त केला. रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जागोजागी घराच्या सज्जातून नागरिक पुष्पवृष्टी करत होते.
