शहरातील सिडको परिसरातील एका खासगी डे-केअर सेंटरमध्ये २३ महिन्यांच्या चिमुकल्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वर्गात उपस्थित असलेल्या दुसऱ्या मुलाने या चिमुकल्याला तब्बल २५ वेळा चावे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वर्गात कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचा दावा पालकांनी केला आहे. या घटनेप्रकरणी पालकांनी संबंधित डे-केअरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, संस्थेच्या व्यवस्थापनाने कारवाई टाळण्यासाठी १० लाख रुपयांची ऑफर आणि मुलाला तीन वर्षांचे मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
नेमकं काय घडलं?
ही घटना २२ जून रोजी सिडको परिसरातील ‘फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स’ या प्री-स्कूलमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास एका महिला वकिलांनी आपल्या २३ महिन्यांच्या मुलाला डे-केअरमध्ये सोडले होते. घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून, त्यामध्ये सुरुवातीला एक महिला केअरटेकर चार मुलांसोबत वर्गात असल्याचे दिसते. काही वेळानंतर एक मूल बाहेर जाण्याचा प्रयत्न करताच ती त्याला घेऊन वर्गाबाहेर जाते. मात्र, उर्वरित तीन लहान मुलांना वर्गात एकटेच सोडले जाते.
१५ मिनिटांत २५ वेळा चावे
केअरटेकर बाहेर गेल्यानंतर वर्गातील एका मुलाने दुसऱ्या चिमुकल्याला वारंवार चावे घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान तिसरे मूल घाबरून एका बाजूला उभे असल्याचे फुटेजमध्ये दिसते. सकाळी ११ ते ११.३० या वेळेत सुमारे १५ मिनिटांच्या कालावधीत पीडित मुलाला २५ वेळा चावे घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या काळात मुलांना मदत करण्यासाठी किंवा हा प्रकार थांबवण्यासाठी कोणताही शिक्षक अथवा कर्मचारी वर्गात नव्हता. त्यामुळे जखमी चिमुकला बराच वेळ वेदनेने रडत असल्याचेही सांगितले जात आहे.
पालकांना उशिरा दिली माहिती
पालक मुलाला दुपारी घरी घेण्यासाठी आले तेव्हाच त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली. सुरुवातीला मुलाला केवळ किरकोळ ओरखडे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कपडे काढल्यानंतर मुलाच्या चेहरा, नाक, ओठ, छाती, पाठ आणि पायांवर चाव्यांच्या अनेक गंभीर जखमा दिसून आल्याने पालक हादरले. यानंतर मुलाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सहा जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर डे-केअरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, प्राचार्या आणि महिला केअरटेकरसह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
‘तक्रार मागे घ्या’, १० लाखांची ऑफर?
पीडित मुलाच्या पालकांचा आरोप आहे की, तक्रार दाखल करू नये यासाठी डे-केअर व्यवस्थापनाने १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि मुलाला तीन वर्षांचे मोफत शिक्षण देण्याची ऑफर दिली. तसेच “आमचं काहीही बिघडवू शकत नाही” असेही सांगितल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, पालकांनी हा प्रस्ताव नाकारत पोलिसांकडे धाव घेतली.
शिक्षण विभागाची कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे. तसेच शहरातील नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या सर्व डे-केअर आणि प्री-प्रायमरी शाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्री-प्रायमरी शाळांसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून डे-केअर सुरू करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका तसेच धर्मादाय आयुक्तालयाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. या तपासणीदरम्यान अनधिकृतपणे सुरू असलेल्या संस्थांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
