मटणानंतर दही खाललं, नाशकात शेतकरी दाम्पत्याला विषबाधा, महिलेचा करुण अंत, वृद्धाची मृत्यूशी झुंज

बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्याने शेतकरी दाम्पत्याला विषबाधा झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. यात द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ६८) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती शांताराम नानाजी ह्याळीज (७८) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मटणानंतर दही खाललं

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे राहणाऱ्या ह्याळीज कुटुंबीयांनी शनिवारी (दि. २७) रात्री मटणाचे जेवण केले. त्यानंतर दही खाण्यात आल्याने ह्याळीज दाम्पत्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा मुलगा आधार ह्याळीज यांनी दोघांना तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, द्वारकाबाई यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून, नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

कुटुंबातील तिघांचेही तेच भोजन

“मी आधी मटण खाल्ले होते. जवळपास एका तासानंतर आई-वडील जेवले. त्यानंतर एक-दीड तासाने आईला उलट्या-जुलाबाचा त्रास सुरु झाला. बाबांनाही त्रास होत होता. मी आईला दवाखान्यात चल म्हणत होतो, पण ती ऐकत नव्हती. नंतर आईची तब्येत खूपच खालावली आणि तिचा मृत्यू झाला.” अशी माहिती मुलाने दिली.

शांताराम ह्याळीज यांना शनिवारी रात्री अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही केवळ ५५ टक्के होते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तसेच त्यांचे ब्लड प्रेशरही कमी झाल्यामुळे त्यांना औषधे दिली जात आहेत. त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *