कल्याण- मुरबाडदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना एस.टी. महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या नव्या दहा गाड्यांमुळे दिलासा मिळाला आहे. अपुऱ्या आणि अनियमित बस फेऱ्यांमुळे प्रवाशांना जीप, सहा आसनी रिक्षांमध्ये दाटीवाटीने बसून त्यांना प्रवास करावा लागत होता. आता नव्या दहा बस गाड्यांमुळे कल्याण-मुरबाडदरम्यान पहाटे साडेपाच ते रात्री नऊपर्यंत दर पंधरा मिनिटांनी बससेवा उपलब्ध होईल, अशी माहिती एस.टी. व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. १३ एप्रिल रोजी सकाळी कल्याण-मुरबाड दरम्यान रायते पुलावर साडेदहाच्या सुमारास इको टॅक्सी आणि सीमेंट मिक्सरचा भीषण अपघात झाला. त्यात इको वाहनात दाटीवाटीने बसलेल्या ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने या मार्गावरील
अपुऱ्या वाहतूक सुविधेचा प्रश्न प्रकर्षाने ऐरणीवर आला. मात्र आता दहा नव्या बसगाड्या या मार्गावर उपलब्ध झाल्याने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याने या नव्या गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. रविवारी आमदारांच्या उपस्थितीत या फेऱ्या सुरू करण्यात आल्या.
राजमाता जिजाऊ योजनेतून बस
राजमाता जिजाऊ शटल योजनेतून उपलब्ध झालेल्या या दहा गाड्यांपैकी पाच गाड्या कल्याण-मुरबाड आणि पाच गाड्या मुरबाड-कल्याण अशा मार्गावर चालवल्या जाणार आहेत. कल्याण आणि मुरबाड दोन्ही ठिकाणांहून सकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता पहिली बस सुटेल आणि रात्री नऊ वाजेपर्यंत या बस फेऱ्या सरासरी पंधरा मिनिटांनी उपलब्ध होतील, अशी माहिती मुरबाडचे आगारप्रमुख योगेश मुसळे यांनी दिली.
विद्यार्थी, प्रवासी आंदोलनाची दखल
एप्रिलमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर या मार्गावरून प्रवास करणारे विद्यार्थी आणि प्रवाशांनी आंदोलन करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. एस. टी. महामंडळाने जादा फेऱ्या सुरू कराव्यात म्हणून त्यांनी सह्यांची मोहीमही राबवली होती.
