जेवणाचं दुपारी कॉल करुन सांगतो, विश्वासचा आईला फोन ठरला अखेरचा, कुटुंबाने शेंडेफळ गमावलं, पहाटे साडेतीनला काळीज चिरणारी बातमी

पुण्यातील राजगड ट्रेकसाठी निघालेल्या खासगी मिनी बसला पाबे घाटात झालेल्या भीषण अपघातात विलेपार्ले पश्चिम, नेहरुनगरमध्ये राहणाऱ्या विश्वास सातिम (२५) याचा मृत्यू झाला. क्रिकेटची प्रचंड आवड, मनमिळाऊ स्वभाव आणि मित्र परिवारात लोकप्रिय असलेल्या विश्वासच्या अचानक झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बस अपघातात दोघांचा मृत्यू

रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पाबे घाटातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने, मिनी बस संरक्षक कठडा तोडून ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ट्रेकसाठी निघालेल्या या बसमध्ये सीप्झमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र विश्वासला वाचवता आले नाही.

घरातील धाकटा मुलगा

विश्वास हा अंधेरीतील सिप्झ येथील दागिने निर्मिती कंपनीत काम करत होता. आई-वडील, भावंडांसोबत तो विलेपार्ले पश्चिमेच्या नेहरुनगरमध्ये राहणारा विश्वास घरातील धाकटा मुलगा होता. त्याचे वडील बाबुराव सातिम माळीकाम करतात. कुटुंबाला हातभार लावत असतानाच, विश्वास स्वतःची स्वप्नेही जपत होता.

ट्रेकला जाताना आईला फोन

कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘रविवारी दुपारी फोन करुन घरी जेवायला येणार की नाही ते कळवेन,’ असे विश्वासने ट्रेकसाठी निघताना आईला सांगितले होते. मात्र पहाटे ३.३० वाजता त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला आणि विश्वास अपघातात जखमी झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी ८ वाजता त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

क्रिकेट खेळण्याची आवड

विश्वासचे मूळ गाव संदेरी (जिल्हा रायगड). लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची विशेष आवड होती. विविध स्पर्धांमध्ये तो नियमित सहभागी होत असे. नोकरी करतानाही, वेळ मिळेल तेव्हा मित्रांसोबत क्रिकेट खेळणे हा त्याचा विरंगुळा होता. अत्यंत मनमिळावू अशी त्याची मित्र मंडळींमध्ये ओळख होती. त्यामुळे त्याच्या निधनाच्या बातमीमुळे मित्र परिवार आणि नातेवाइकांना मोठा धक्का बसला.दरम्यान, या अपघातातील जखमींमध्ये नऊ महिलांचा समावेश असून, त्यांच्यावर वेल्हे ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंधेरी, नालासोपारा, चुनाभट्टी, मानखुर्द, भांडुप, विलेपार्ले, डोंबिवली, विरार, गावदेवी, जोगेश्वरी, संतोष नगर, महात्मा गांधी नगर येथील रहिवाशांचा यात समावेश आहे.

प्रवासी सीटखाली अडकले

बस कोसळत असताना उलटल्यामुळे सर्व प्रवासी सीट खाली अडकले. फिर्यादींनी ११२ क्रमांकावर फोन केला. खबर मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी क्रेन आणल्यावर रात्री अंधारात बचावकार्य सुरु करण्यात आले. बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. वेल्हे ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. तिथे डॉक्टरांनी विश्वास सातिम याच्यासह सहकारी ध्वनी चंद्रेश ठक्कर (२३ रा. ओम पॅलेस, कांदिवली) यांना मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *