जेवणाचं दुपारी कॉल करुन सांगतो, विश्वासचा आईला फोन ठरला अखेरचा, कुटुंबाने शेंडेफळ गमावलं, पहाटे साडेतीनला काळीज चिरणारी बातमी

पुण्यातील राजगड ट्रेकसाठी निघालेल्या खासगी मिनी बसला पाबे घाटात झालेल्या भीषण अपघातात विलेपार्ले पश्चिम, नेहरुनगरमध्ये राहणाऱ्या विश्वास सातिम (२५) याचा मृत्यू झाला. क्रिकेटची प्रचंड आवड, मनमिळाऊ स्वभाव आणि मित्र परिवारात लोकप्रिय असलेल्या विश्वासच्या अचानक झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बस अपघातात दोघांचा मृत्यू

रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पाबे घाटातील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने, मिनी बस संरक्षक कठडा तोडून ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. ट्रेकसाठी निघालेल्या या बसमध्ये सीप्झमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र विश्वासला वाचवता आले नाही.

घरातील धाकटा मुलगा

विश्वास हा अंधेरीतील सिप्झ येथील दागिने निर्मिती कंपनीत काम करत होता. आई-वडील, भावंडांसोबत तो विलेपार्ले पश्चिमेच्या नेहरुनगरमध्ये राहणारा विश्वास घरातील धाकटा मुलगा होता. त्याचे वडील बाबुराव सातिम माळीकाम करतात. कुटुंबाला हातभार लावत असतानाच, विश्वास स्वतःची स्वप्नेही जपत होता.

ट्रेकला जाताना आईला फोन

कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘रविवारी दुपारी फोन करुन घरी जेवायला येणार की नाही ते कळवेन,’ असे विश्वासने ट्रेकसाठी निघताना आईला सांगितले होते. मात्र पहाटे ३.३० वाजता त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला आणि विश्वास अपघातात जखमी झाल्याचे समजले. त्यानंतर सकाळी ८ वाजता त्याच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *