वडाळा- मुलुंड- ठाणे- कासारवडवली- गायमुख मेट्रो-४ आणि ४ए मार्गासाठी मोघरपाडा येथील कार डेपोला जोडणारा रस्ता व जोड मार्गिका (स्पर लाईन) बांधण्यासाठी आवश्यक ०.३९ हेक्टर खारफुटी वनक्षेत्र एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय महसूल व वन विभागाने घेतला आहे. या प्रस्तावाला केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडून यापूर्वी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आवश्यक अटींची पूर्तता झाल्याचा अहवाल सादर केल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे मेट्रो कारशेडकडे ये-जा करण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूसंपादन प्रक्रिया पूर्ण
ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी मोघरपाडा येथे मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कार डेपोपर्यंत पोहोचण्यासाठी ६५ मीटर लांबीचा अ ॅप्रोच रोड, जोड मार्गिका तसेच, संबंधित बांधकाम विकसित केले जाईल. ही जमीन एमएमआरडीएच्या माध्यमातून वापरण्यात येणार असून तिचे हस्तांतरण आवश्यक होते. मात्र, या परिसरात कांदळवन असल्याने वनविभागाकडूनच ही जमीन हस्तांतरित करावी लागली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या तत्त्वतः आणि अंतिम मंजुरीतील सर्व अटींचे पालन करण्याच्या तसेच खारफुटी कक्षाकडून नियमित देखरेख ठेवण्याच्या अटीवर हे हस्तांतरण झाले.
मुंबईला ठाणे शहराशी जोडणारी मेट्रो मार्गिका ४ ३२.३२ किमी लांब आहे. ग्रीन लाइनमुळे शहरातील पूर्वीतील उपनगरांना जोडणी मिळणार आहे. वडाळा ते कासारवडवलीपर्यंत जोडणाऱ्या या मार्गिकेमुळे एलबीएल मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. कासारवडवलीपासून गायमुखपर्यंत मेट्रो मार्गिका ४अ तयार केली असेल. मेट्रो मार्ग ४ अ काम पूर्ण होत आलं असून ४ ब चं बांधकाम सुरू होणार आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. गायमुखपर्यंत मार्ग २०२९ /२०३० पर्यंत प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.
