बांधकामांचा सपाटा सुरूच, चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये बांधकामांचे इमले; अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर

दाटीवाटीने उभारलेली बांधकामे… चिंचोळ्या गल्ल्या… अग्निसुरक्षेच्या नियमांना फासलेला हरताळ अशा प्रकारे मानपाडा येथील कोठारी कंपाऊंड परिसरात दररोज बांधकामे उभारण्याचा सपाटा कायम आहे. एकीकडे ठाणे महापालिका प्रशासनाकडून शिळफाट्यातील अडीचशेहून अधिक अनधिकृत गोदामांवर कारवाई करण्यात आलेली असताना ‘कोठारी’ मधील अनियमितपणे उभारल्या जाणाऱ्या बांधकामांना थेट अभय देण्यात येत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी नुकताच पालिकेच्या महासभेत केला होता. तरीही नियमावली धाब्यावर बसवत या भागात बिनदिक्कतपणे बांधकामे सुरूच आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पालिका प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठाण्यातील मानपाडा परिसरात २७, ७ आणि ५ एकर अशा विस्तीर्ण भागात कोठारी कंपाउंड अस्तित्वात आहे. पूर्वी गोदाम व लघु उद्योग असणाऱ्या या भागात १० ते १५ वर्षांपूर्वी फर्निचर मार्केट आणि त्याच्या माल साठवणुकीची गोदामे टप्प्याटप्प्याने उभी राहिली. त्यानंतर हॉटेल, लाउंज, पब, हुक्का पार्लरचे पेव या भागात फुटले. तसेच वाहनांचे सर्व्हिस सेंटर, वॉशिंग सेंटर, मार्बल व टाइल्स गोदाम, बार, लॉजिंग व्यवसाय या भागात अनिर्बंधपणे फोफावला. रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या येथील पब, लाउंज व हुक्का पार्लरचा मुद्दा अनेकदा विधिमंडळ अधिवेशनात गाजला. स्थानिकांना येथील गोंधळाचा त्रास होत असूनही प्रशासन कारवाईत बोटचेपे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप ठाणे पालिकेच्या महासभेत प्रभारी विरोधी पक्षनेत्या मार्जिया पठाण यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *