108 कलशांनी स्नान अन् त्यानंतर आजारी पडणार देव; 15 दिवसांच्या विश्रांतीची काय अख्यायिका?

जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेत दिसणारं प्रत्येक दृश्य पाहणाऱ्याला हैराण करणारं असतं. श्रद्धेचा महासागर या रथयात्रेदरम्यान उसळतो आणि एक अनपेक्षित दृश्य नजर रोखून धरतं. अशा या यात्रेपूर्वी तिथं काही पूजाविधी आणि पारंपरिक रुढी पार पडतात, अशा विधींना स्नान यात्रा असंही म्हणतात. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी महाप्रभू जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या प्रतिमांचं विशेष स्नान होतं, ज्यामुळं या यात्रेला स्नान यात्रा म्हणतात.

यंदाच्या वर्षी 16 जुलै रोजी जगन्नाथ रथयात्रा असून, 29 जून रोजी स्नानयात्रा आहे. ज्या स्नानानंतर 15 दिवस देवांची प्रकृती बिघडेल असं म्हणत ते विश्रांतीसाठी 15 दिवसांच्या एकांतवासात जातात अशी धारणा आहे. स्नान यात्रा म्हणजे रथयात्रोत्सवाची औपचारिक सुरुवात असते. जिथं तिन्ही मूर्तींना 108 पवित्र कलशांमधील जलासह स्नान घातलं जातं. एका पवित्र विहिरीतून हे पाणी आणलं जातं, जी वर्षातून एकदाच स्नान यात्रेसाठी उघडली जाते. या पाण्यामध्ये विशेष वनस्पतीआदी गोष्टी मिसळून तिन्ही देवी देवतांना स्नान घातलं जातं.

देवाचा विशेष श्रृंगार 

स्नान यात्रेदिवशी देवाचा विशेष श्रृंगार केला जातो. ज्यानंतर भगवान जगन्नाथ यांना खास गजवेश दिला जातो म्हणजे त्यांचं मुख गजानन रुपात सजवलं जातं. याच परंपरेशी संबंधित एक आख्यायिका सांगण्यात येते की गणपतीच्या एका भक्तानं जेव्हा जगन्नाथाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली तेव्हा खुद्द भगवान जगन्नाथांनीच गजानन रुप धारण करत त्या भक्ताला दर्शन दिलं. याच परंपरेचं पालन करत स्नानयात्रेच्या दिवशी भगवान जगन्नाथ हे गजरुपात असतात.

15 दिवस देवदर्शन नाही… 

स्नानयात्रेनंतर महाप्रभू जगन्नाथ हे 15 दिवसांसाठी प्रतिकात्मक रुपात प्रकृती अस्वास्थ्यामुळं एकांतवासात जातात. यादरम्यान भाविकांना देवाचं दर्शन घेता येत नाही. तर, पुजारीसुद्धा विविध प्रकारचे काढे देवाला नैवेद्य स्वरुपात देतात. मानवाप्रमाणं देवाचं प्रकृती स्वास्थ्यही बिघडतं याचच हे प्रतीक. इथं देवाला औषधीसुद्धा दिली जाते. 15 दिवसांच्या या कालावधीनंतर देवाची तब्येत सुधारून एका नव्या रुपात जगन्नाथ भाविकांना दर्शन देण्यासाठी सज्ज होतात आणि त्यानंतर धार्मिक विधींना सुरुवात होते. जिथं भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र 3 दिव्य रथांमध्ये स्वार होऊन गुंडिचा मंदिराच्या दिशेनं निघतात. या रथांचे दोर ओढण्यासाठी देशभरातून, जगभरातून भाविकांची गर्दी इथं पाहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *