गिरगावमधील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या देह व्यापाराच्या कथित रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. यावेळी दोन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली. यापैकी एक अभिनेत्री मराठी चित्रपटांमधील आघाडीची नायिका आहे, तर दुसरीने बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका (कॅमिओ) साकारल्या आहेत. या कारवाईदरम्यान एका दलालाला रंगेहाथ पकडण्यात आले. तो सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट असल्याचे सांगितले जाते. मुंबई पोलिसांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सुटका
“मुंबई पोलिसांनी गिरगावमधील एका हॉटेलवर छापा टाकून देह व्यापाराचा कथित अड्डा उद्ध्वस्त केला आणि दोन अभिनेत्रींची सुटका केली; यातील एक प्रसिद्ध अभिनेत्री मराठी असून तिने अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका केल्या आहेत, तर दुसरी अभिनेत्री बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांत छोट्या भूमिकांसाठी ओळखली जाते. या कारवाईदरम्यान एका दलालला रंगेहाथ पकडण्यात आले” असे मुंबई पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या महिलांची ओळख उघड केलेली नाही.
मोठी रक्कम उकळली
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलांना देह व्यापार करण्यास भाग पाडले जात होते आणि ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळली जात होती. छापा टाकण्यापूर्वी या बेकायदेशीर कृत्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवले होते.
पोलीस अधिकारी या कथित नेटवर्कचा, तसेच देह व्यापाराला चालना देण्यात सहभागी असलेल्यांच्या भूमिकेचा तपास करत आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलीस आर्थिक व्यवहार, संवादाच्या नोंदी आणि मानवी तस्करीच्या एखाद्या मोठ्या रॅकेटशी असलेले संभाव्य दुवे यांची तपासणी करत आहेत. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
याआधी तुर्भे नाक्यावर लॉजवरही छापा
याआधी, याच वर्षी जानेवारी महिन्यात, नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरातील एका लॉजमध्ये चालवले जाणारे अनैतिक देह व्यापाराचे रॅकेट ‘मानवी तस्करी विरोधी पथका’ने उघडकीस आणले होते. या पथकाने तेथून सात महिलांची सुटका केली. एका गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित तीन जणांना अटक केली होती.
