पालघर जिल्ह्यातील कोरे या गावच्या किनाऱ्यावर देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रस्तावित विमानतळाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश दिले.
कुठे उभारणार विमानतळ?
प्रस्तावित विमानतळाची जागा उत्तन–विरार सागरी सेतूपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सागरी सेतूचा विस्तार करून थेट विमानतळापर्यंत जोडणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, यामुळे मुंबईहून विमानतळापर्यंत जलद आणि अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. मुंबई विमानतळापासून सुमारे ५० ते ५२ किलोमीटर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर असलेला हा प्रकल्प भविष्यात राज्याच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. विशेष म्हणजे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या परिसरात असल्याने पालघर जिल्ह्याच्या शहरी विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचाही आढावा घेतला. पाहणी दौऱ्यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे, पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
“विमानतळ, बंदरे, रस्ते, बुलेट ट्रेन आणि इतर मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे येत्या काळात पालघर जिल्हा राज्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि रोजगार निर्मितीच्या केंद्रस्थानी असेल, ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
वसई-विरार शहरांना जोडणारा खाडीपूल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचणी बीचवर काम सुरू असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत रस्त्यांचं नेटवर्क, वन मंजुरी, वीजपुरवठा, रेल्वे कनेक्टिव्हिटी, भूसंपादन, पाणीपुरवठा, कौशल्य विकास आणि मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसह अनेक गोष्टींचा आढावा घेतला. या शिवाय वसई-विरार, सफाळे, पालघर आणि बोईसरमध्ये थेट संपर्क स्थापित करण्यासाठी नारिंगी खाडीपूल उभारण्यात येतो आहे. यामुळे या शहरांदरम्यान ४० किमी अंतर कमी होणार आहे तसचं प्रवासात ४५ मिनिटं वेळ वाचणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून बंदराची लांबून पाहणी
वाढवण बंदराच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी डहाणूतील चिंचणी समुद्रकिनारी भेट दिली. यावेळी चिंचणीसह वाढवण, वरोर आणि परिसरातील गावांमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त होता. वाढवण विरोधकांचे गालबोट लागू नये, म्हणूनच ५ किमी लांबून मुख्यमंत्र्यांनी स्थळपाहणी केल्याची चर्चा रंगली होती.
