ठाणे, डोंबिवली येथून नवी मुंबईकडे वाहनचालकांची जाणाऱ्या होणाऱ्या वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. कल्याण-शीळ मार्गावर उभारण्यात आलेल्या उन्नत ऐरोली ते काटई नाका मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून पहिले दोन टप्पे जुलैअखेरीस वाहतुकीसाठी सुरू केले जाणार आहेत. एमएमआरडीएकडून या मार्गासाठी अनुकुलता दाखविण्यात आली आहे.
डोंबिवली ते नवी मुंबई १५ मिनिटांत
ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा एमएमआरडीए क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो. सुमारे १२.७१ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ऐरोली ते डोंबिवली दरम्यानचे अंतर सुमारे १० किलोमीटरने कमी होणार असून, प्रवासासाठी लागणारा ३० ते ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई ते डोंबिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प मंजूर करण्यासह त्याला गती देण्यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या प्रकल्पातील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग-४ या ३.४३ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे ९२ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून उर्वरित किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. तर ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड या २.५७ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही टप्प्यांचे उद्घाटन करून ते एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. या दोन्ही टप्प्यांमुळे महापे, शिळफाटा, कल्याण फाटा तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक जलद होणार आहे. मुलुंड-ऐरोली पूल, ठाणे-बेलापूर मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग-४ यांच्यात अखंड व जलद संपर्क निर्माण होणार असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ, इंधन आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे.
मालवाहतुकीला मार्गाचा मोठा फायदा
औद्योगिक क्षेत्रातील मालवाहतुकीला या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग-४ ते काटई नाका या ६.७१ किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू झाले असून हा टप्पा येत्या एक ते दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १२.७१ किलोमीटरचा ऐरोली-काटई उन्नत मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील वाहतूक अधिक गतिमान होणार आहे. जुलै महिन्यात पहिला आणि दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक वेगवान करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
