भिवंडीतील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; कर्ज देण्याच्या नावाखाली करायचे फसवणूक, 9 जणांविरुद्ध गुन्हा

 ठाणे जिल्ह्यात बोगस कॉल सेंटरचा सुळसुळाट सुरू असतानाच, भिवंडीतही अशाच प्रकारचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा नारपोली पोलिसांनी पर्दाफाश करत चालकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडीतील अंजूरफाटा येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १९ जूनच्या रात्री छापा टाकण्यात आला. यावेळी फ्लॅटमध्ये सुरू असलेले बोगस कॉल सेंटर उघडकीस आले. संबंधित ठिकाणी मागील चार महिन्यांपासून हे कॉल सेंटर सुरू होते. या केंद्राचा चालक हा एक तरुण असून त्याच्यासह आणखी एका व्यक्तीच्या मदतीने हा व्यवसाय चालवला जात होता. येथे काही युवक-युवती काम करत असून त्यापैकी पाच जण कॉलर, एक शिपाई आणि एक जण देखरेखीसाठी नेमलेला होता. पोलिसांनी सर्वांचे मोबाइल जप्त केले आहेत.

या कॉल सेंटरमार्फत कर्जाची गरज असलेल्या नागरिकांचे मोबाइल क्रमांक विविध सामाजिक माध्यमांतून मिळवले जात होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून संबंधित नागरिकांना फोन करून एका फायनान्स कंपनीमार्फत कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात होते. नागरिकांकडून कागदपत्रे मागवून ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली २,००० ते ५,००० रुपये उकळले जात होते. ही रक्कम कॉल सेंटरमधील कर्मचारी एटीएममधून काढून घेत असल्याचेही निष्पन्न झाले. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही कर्ज दिले जात नव्हते.

कागदपत्रांशिवाय सिमकार्ड खरेदी
फसवणुकीसाठी वापरली जाणारी सिमकार्डे आरोपी रस्त्यावरील विक्रेत्यांकडून कोणतीही कागदपत्रे न देता सुमारे १,२०० रुपयांना खरेदी करत होते. ही सिमकार्डे साधारण दहा दिवसांनी व्हेरिफिकेशन न झाल्याने बंद होत असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *